

अलिबाग ः रायगड जिल्हा परिषद व जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदानप्रक्रिया राबविण्यात येणार असून, मतदानप्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
जिल्ह्यात 2 हजार 323 मतदान केंद्र आहेत. 17 लाख 381 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, जिल्हा परिषदेच्या 59 गटांसाठी 173 तर 15 पंचायत समित्यांमध्ये 329 उमेदवार नशीब अजमावत आहेत. मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर एक निवडणूक अधिकारी तसेच तीन कर्मचारी व एक शिपाई नेमण्यात आला आहे. छाया ः
याव्यतिरिक्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहे. मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून ही पथके मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी करणार आहेत.
17 लाख पात्र मतदार
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. आरक्षण, मतदान यादी, मतदार केंद्र निश्चित झाले आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये 17 लाख 381 मतदार आहेत. त्यात 8 लाख 57 हजार 9 महिला आणि 8 लाख 46 हजार 347 पुरुष तसेच इतर 25 मतदारांचा समावेश आहे.
तालुकावार मतदान केंद्र
जिल्ह्यात 2 हजार 323 मतदान केंद्र आहेत. पनवेल 346 मतदान केंद्र असून, कर्जत 220, खालापूर 144, सुधागड 75, पेण 190, उरण 135, अलिबाग 261, मुरुड 81, रोहा 194, तळा 52, माणगाव 206, म्हसळा 69, श्रीवर्धन 80, महाड 203, पोलादपूर 67 मतदान केंद्र आहेत.
कुणाची सत्ता येणार
2017 मध्ये पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने 23 जागांवर विजय मिळविला होता. तर शिवसेना 18, राष्ट्रवादी काँग्रेस 12, काँग्रेस 3 व भाजपने 3 जागांवर विजय मिळविला होता. यांनतर शेकाप व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली होती. सुरुवातीची अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस व शेवटची अडीच वर्ष शेतकरी कामगार पक्षाने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले.यावेळी कुणाची सत्ता येणार याबाबत जिल्ह्यात उत्सुकता लागली आहे.