

पेण ः स्वप्नील पाटील
लोणावळ्याजवळ मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ प्रोपेलिन गॅस वाहून नेणारा टँकर उलटून भीषण अपघात झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना असंख्य वाहनचालकांसह प्रवाशांना बसला.रायगड एसटी विभागालाही या समस्येला सामोरे जावे लागले.संभाव्य कोंडी लक्षातघेऊन या मार्गावरील लांब पल्ल्याच्या 12 एसटी बसेस फेऱ्या रद्द करण्यात आल्या.याचा मोठा फटका एसटी प्रवाशांना बसला आहे.
या महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या अनेक गाड्या अडकल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या वाहतूक कोंडीमध्ये एसटी महामंडळाच्या देखील अनेक गाड्या अडकल्या असून रायगड एसटी विभागाच्या सहा गाड्या अडकल्याने बारा फेऱ्या खोळंबल्या गेल्याचा प्रकार घडला आले. हा अपघात समजताच तातडीने रायगड एसटी विभागाच्या तीन फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
मुंबई - पुणे महामार्गावर अपघात होणे आणि त्यानंतर वाहतूक कोंडी होणे हे आता एकप्रकारे दिनक्रमच झाला आहे. बुधवारी आज त्याचा फटका टँकर पलटी झाल्याने रायगड एसटी विभागाला बसला आहे. या अपघातदरम्यान याच महामार्गावर प्रवासी वाहतूक करत असणाऱ्या अलिबाग - अक्कलकोट, अलिबाग - पंढरपूर, अलिबाग - पुणे, अलिबाग - भगवानगड, मुरूड - गहिनाथगड, मुरूड - स्वारगेट या गाड्या अडकल्या.तर अलिबाग - सातारा, अलिबाग - पुणे, मुरूड - स्वारगेट या गाड्या रायगड विभागाला रद्द कराव्या लागल्या आहेत.
एकूणच काय तर या महामार्गावर झालेल्या या अपघातामुळे रायगड विभागाच्या सहा गाड्या म्हणजेच बारा फेऱ्या चार ते पाच तास अडकून राहिल्या तर तीन गाड्या आयत्यावेळी रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.
खासगी वाहनचालकही अडकले
या मार्गावरुन खासगी वाहनातून प्रवास करणारे खासगी वाहनचालकही या कोंडीत अडकून पडल्याने त्यांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. तेथून कधी बाहेर पडतो अशी बिकट अवस्था झालेली आहे.अलिबागआगारातून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व बसेस दुपारी 12 नंतर पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत.सकाळच्या सत्रात धावणाऱ्या एसटी बसेस लोणावळा येथून माघारी परतल्या आहेत,अशी माहिती अलिबाग आगारातून देण्यातआली.यामुळे एसटीचे नियमित वेळापत्रकही कोलमडून गेल्याने त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला.