Raigad Rain: अवकाळीचा घाला! लग्नसराईवर पावसाचे सावट; मंडप, डेकोरेशन व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान

आगाऊ बुकिंग रद्द झाल्याने हवालदिल
Raigad unseasonal rain wedding damage
Raigad unseasonal rain wedding damagePudhari
Published on
Updated on

शरद निकुंभ

पाली: सध्या सर्वत्र लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू असतानाच अवकाळी वादळी पावसाने आनंदाच्या वातावरणावर अक्षरशः विरजण घातले आहे. रायगड जिल्ह्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या जोरदार वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी लग्नाचे मांडव कोसळले, सजावटीचे साहित्य उडून गेले तर विद्युत रोषणाई आणि ध्वनी व्यवस्था भिजून निकामी झाली.

या नैसर्गिक संकटामुळे मंडप, डेकोरेशन, लाईटिंग, डीजे व केटरिंग व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ऐन लग्नसराईत व्यवसायावर मोठे संकट ओढवले आहे.रायगड जिल्ह्यातील पाली, सुधागड, रोहा, माणगाव, महाड आदी भागांत शनिवारी अचानक हवामानात बदल झाला.

प्रचंड वेगाने वाहणारे वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे अनेक लग्न समारंभांमध्ये गोंधळ उडाला. काही ठिकाणी लग्नविधी सुरू असतानाच मंडप उखडून गेले, तर अनेक ठिकाणी पाण्याचा मारा झाल्याने पाहुण्यांची पळापळ झाली. वधू-वर पक्षाने मोठ्या खर्चातून उभारलेली सजावट काही मिनिटांत जमीनदोस्त झाल्याने आनंदाच्या क्षणी चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

Raigad unseasonal rain wedding damage
Raigad Fort: किल्ले रायगडावरील तलावांचा पाणीसाठा वाढविण्याची गरज

विशेष म्हणजे, सध्या लग्नसराईचा पीक हंगाम असल्याने मंडप व डेकोरेशन व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात साहित्य, कपडे, लाईटिंग, जनरेटर, साऊंड सिस्टीम आणि कार्पेट यामध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र अवकाळी पावसामुळे या साहित्याचे मोठे नुकसान होत असून अनेकांना कर्ज काढून व्यवसाय सांभाळण्याची वेळ आली आहे.

काही व्यावसायिकांनी तर एका कार्यक्रमातच लाखभर रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचे सांगितले. याशिवाय हवामान खात्याने 17 तारखेपासून पुन्हा पावसाची शक्यता वर्तविल्याने आगामी लग्न समारंभांवरही अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.

पावसाच्या भीतीमुळे अनेक कुटुंबांनी खुल्या मैदानातील विवाह सोहळे टाळण्याचा निर्णय घेतला असून, मंडप व डीजेच्या आगाऊ बुकिंग रद्द करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आधीच नुकसान सहन करणाऱ्या व्यावसायिकांसमोर आता आर्थिक संकट अधिक गडद होत आहे.

Raigad unseasonal rain wedding damage
Raigad Fort: किल्ले रायगडावरील तलावांचा पाणीसाठा वाढविण्याची गरज

ग्रामीण भागातील छोट्या व्यावसायिकांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत आहे. अनेकांनी हंगामासाठी मोठ्या प्रमाणावर साहित्य भाड्याने आणले किंवा नवीन खरेदी केले होते. मात्र आता कार्यक्रम रद्द होत असल्याने खर्च वसूल होणेही कठीण झाले आहे. एका बाजूला साहित्याचे नुकसान आणि दुसऱ्या बाजूला बुकिंग रद्द होणे, अशा दुहेरी संकटात हे व्यावसायिक सापडले आहेत.

हॉल व्यावसायिकांची चांदी

अवकाळी पावसामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने आता अनेक कुटुंबे मोकळ्या मैदानातील विवाह सोहळ्यांऐवजी मंगल कार्यालये आणि बंदिस्त हॉलला पसंती देऊ लागली आहेत. परिणामी हॉलचे बुकिंग अचानक वाढले असून काही ठिकाणी पुढील तारखांसाठी प्रतीक्षा यादी तयार झाली आहे. मात्र ग्रामीण भागात अद्याप पुरेशा प्रमाणात मंगल कार्यालयांची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकांना कमी सुविधांमध्ये किंवा पर्यायी ठिकाणी लग्न समारंभ उरकावे लागत असल्याचे चित्र आहे.

शनिवारी आलेल्या वादळी पावसाने माझे जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मांडवाचा महागडा कपडा फाटला असून मॅट, कार्पेट आणि सजावटीचे साहित्य खराब झाले आहे. इलेक्ट्रिक साहित्य आणि उपकरणे भिजल्याने ती आता वापरण्यायोग्य राहिलेली नाहीत. एवढेच नव्हे तर पावसाच्या धास्तीने लोकांनी पुढील कार्यक्रमांच्या बुकिंगही रद्द करण्यास सुरुवात केली आहे. ऐन हंगामात हाताशी आलेले काम या पावसाने हिरावून घेतले.”

- सौरभ यादव, मंडप व डेकोरेशन व्यावसायिक, सुधागड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news