Raigad Fort: किल्ले रायगडावरील तलावांचा पाणीसाठा वाढविण्याची गरज

श्रीगोंदा तलावातील अंतर्गत दोन तलावाप्रमाणे फुटका व हत्ती तलावामध्ये निर्मिती शक्य
Raigad Fort
Raigad FortPudhari
Published on
Updated on

श्रीकृष्ण बाळ

महाड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जलव्यवस्थापन पद्धतीचा अभ्यास करून रायगड किल्ल्यावरील तलावांचा पाणीसाठा वाढवता येऊ शकतो, असा निष्कर्ष इतिहास अभ्यासक आणि जलसंवर्धन तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

रायगडावरील श्रीगोंदा तलावामध्ये शिवकाळात तयार करण्यात आलेल्या अंतर्गत दोन तलावांच्या रचनेमुळे पाणीसाठा दीर्घकाळ टिकून राहत असल्याचे निरीक्षण समोर आले आहे. याकरिता रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती यांसह केंद्रीय पुरातत्त्व विभाग व राज्य शासनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी राहणार आहे.

रायगड किल्ल्यावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र, पावसाचे पाणी योग्य प्रकारे साठवले न गेल्याने उन्हाळ्यात अनेक तलाव कोरडे पडतात. शिवकालीन स्थापत्यकलेमध्ये नैसर्गिक उतार, दगडी बांधकाम आणि पाण्याच्या प्रवाहाचे नियोजन यांचा अत्यंत प्रभावी वापर करण्यात आला होता. श्रीगोंदा तलावाची रचना हे त्याचे उत्तम उदाहरण मानले जाते.

इतिहास अभ्यासकांच्या माहितीनुसार, श्रीगोंदा तलावामध्ये मुख्य तलावाच्या आत आणखी दोन लहान तलाव तयार करण्यात आले होते. पहिल्या भागात पावसाबरोबर येणारा गाळ साचत असे, तर त्यानंतर स्वच्छ पाणी दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात जमा होत असे. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता टिकून राहत होती आणि साठा अधिक काळ उपयोगी पडत होता. ही पद्धत त्या काळातील प्रगत जलव्यवस्थापनाचे प्रतीक मानली जाते.

रायगडावरील अनेक तलावांमध्ये गाळ साचणे, पाण्याच्या जुन्या वाहिन्या बंद होणे आणि देखभालीअभावी पाणी साठवण क्षमता कमी झाल्याचे दिसून येते. तज्ज्ञांच्या मते, शिवकालीन रचना आणि मूळ जलमार्गांचे पुनरुज्जीवन केल्यास पावसाचे अधिकाधिक पाणी साठवता येईल. तलावांचे गाळमुक्तीकरण, दगडी बांधांची दुरुस्ती आणि पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला मोकळीक देणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले.

रायगड हा ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा किल्ला असल्याने तेथील जलव्यवस्थापन सुधारल्यास पर्यटकांसह संवर्धन कार्यालाही मोठा फायदा होणार आहे. शिवकालीन जलतंत्राचा आधुनिक पद्धतींसह वापर केल्यास रायगडावरील पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो, असा विश्वास अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news