Mangaon Nagar Panchayat Election: रायगडमधील सहा नगरपंचायतींच्या निवडणुकांचे पडघम

माणगावमध्ये नगरसेवकांची फोडाफोड, पक्षांतर आणि विकासकामांच्या श्रेयवादाने राजकीय वातावरण तापले
Mangaon Nagar Panchayat Election
Mangaon Nagar Panchayat ElectionPudhari
Published on: 
Updated on: 

अरुण पवार

माणगाव: रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या निवडणुकांचे वारे आता गावागावांत पोहोचू लागले आहेत. खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पाली आणि पोलादपूर या सहा नगरपंचायतींची मुदत २७ फेब्रुवारी २०२७ रोजी संपत असल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

राज्यातील १०५ नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील या सहा नगरपंचायतींवरही सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

या सहा नगरपंचायतींमध्ये प्रत्येकी १७ याप्रमाणे एकूण १०२ नगरसेवकांच्या जागांसह सहा नगराध्यक्षपदांसाठी निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार आहे. विशेष म्हणजे, महायुती सरकारने नगराध्यक्ष निवडीची पद्धत बदलल्याने आता नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून होणार आहे.

Mangaon Nagar Panchayat Election
Navi Mumbai Orchestra Licence: ऑर्केस्ट्रा परवान्यांबाबत आठ आठवड्यांत निर्णय घ्या; उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश

त्यामुळे नगरसेवकांच्या संख्याबळाबरोबरच नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची लोकप्रियताही निर्णायक ठरणार आहे. स्थानिक पातळीवर जनतेशी असलेला संपर्क, विकासकामांचा अनुभव आणि मतदारांशी असलेले नाते यांची खरी कसोटी या निवडणुकीत लागणार आहे.

शिवसेना-राष्ट्रवादीचा सत्तासंघर्ष!

माणगाव नगरपंचायतीमध्ये सुरुवातीला शिवसेनेची सत्ता होती. त्यानंतर बदललेल्या राजकीय समीकरणांत राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तास्थापना केली. त्यामुळे आगामी निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आपल्याच पक्षाची सत्ता येणार, असे दावे-प्रतिदावे दोन्ही बाजूंकडून केले जात आहेत.

नगरपंचायतीच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचे श्रेय घेण्यावरूनही दोन्ही पक्षांमध्ये राजकीय रस्सीखेच सुरू आहे. कोणत्या कामासाठी कोणी पाठपुरावा केला, कोणाच्या प्रयत्नांतून निधी उपलब्ध झाला आणि शहराच्या विकासाला कोणी गती दिली, यावरून राजकीय वातावरणात आरोप-प्रत्यारोपांचे सूर उमटू लागले आहेत. त्यातच नगरसेवकांची पक्षांतरे आणि राजकीय गटबाजी यामुळे आगामी निवडणुकीची रंगत आतापासूनच वाढली आहे.

तिसऱ्या आघाडीची शक्यता

या निवडणुकीत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच सामना रंगणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. समविचारी पक्षांना एकत्र आणून तिसरी आघाडी उभी करण्याच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

Mangaon Nagar Panchayat Election
Kalyan Badlapur Railway Block: कल्याण-बदलापूरदरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक; काही लोकल फेऱ्या रद्द

या आघाडीत इतर पक्षांनाही सहभागी करून सामूहिकपणे निवडणूक लढविण्याची रणनीती आखली जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ही संभाव्य आघाडी प्रत्यक्षात आकाराला आल्यास माणगावच्या राजकीय समीकरणांना नवे वळण मिळू शकते. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससमोर तिसऱ्या आघाडीचेही आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आगामी निवडणुकीत पक्षीय निष्ठा, स्थानिक नेतृत्व, नगरसेवकांची कामगिरी आणि विकासकामांचा लेखाजोखा हे महत्त्वाचे मुद्दे ठरणार आहेत. माणगावकरांना केवळ सत्तेची आश्वासने नकोत, तर रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, गटारे, वाहतूक व्यवस्था आणि मूलभूत नागरी सुविधांमध्ये प्रत्यक्ष सुधारणा अपेक्षित आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोणाकडे ठोस दृष्टी आहे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी कोण प्रत्यक्ष मैदानात उतरते, याकडे मतदारांचे लक्ष राहणार आहे.

सध्या पडद्यामागे राजकीय जुळवाजुळव, संभाव्य आघाड्या, पक्षांतर आणि सत्तेच्या नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. सहा नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या निमित्ताने संपूर्ण रायगड जिल्ह्यात राजकीय वातावरण तापत असताना माणगावमध्ये मात्र शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाव्य तिसरी आघाडी यांच्यातील राजकीय गणिते कशी जुळतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अखेर राजकीय पक्षांचे दावे कितीही मोठे असले, तरी सत्तेचा खरा कौल माणगावची जनता मतदानाच्या माध्यमातूनच देणार आहे. त्यामुळे आगामी निवडणूक ही केवळ सत्तांतराची लढाई न ठरता माणगावच्या विकासाची दिशा ठरविणारी निर्णायक लोकशाहीची कसोटी ठरणार आहे!

जानेवारी-फेब्रुवारीत निवडणुकीचे संकेत

नगरविकास विभागामार्फत डिसेंबर महिन्यात प्रभागरचनेची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी साधारण महिनाभराचा कालावधी अपेक्षित असून, डिसेंबरमध्ये प्रभागरचना पूर्ण झाल्यास जानेवारीत प्रभागनिहाय मतदारयाद्या तयार होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

भारत निवडणूक आयोगाच्या एसआयआर मोहिमेनंतर २२ डिसेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होण्याची शक्यता असून, त्यानंतर निवडणुकीच्या प्रक्रियेला अधिक वेग येण्याचे संकेत आहेत. त्यामुळे जानेवारी-फेब्रुवारी २०२७ मध्ये नगरपंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.