

रायगड: महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची अर्थात एसआयआर मोहीम निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या प्रारुप मतदार यादी नुसार रायगड जिल्ह्यातील वगळली जाणारी (अनकलेक्टेबल) मतदार संख्या ५ लाख ८४ हजार ११८ आहे.
दरम्यान ३१ ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रारुप यादीत रायगड जिल्ह्याचे एकुण मतदार १९ लाख ४९हजार ६२१ असून त्यामध्ये ९ लाख ८४ हजार ३१२ पूरुष, ९ लाख ६५ हजार २७४ महिला आणि ३५ तृतीय पंथी मतदार आहेत.
या सर्व अनकलेक्टेबल मतदारांची नावे आपोआप मतदार यादीतून वगळली जातील असे नाही. मात्र, ज्यांचे फॉर्म उपलब्ध नाहीत, ज्यांच्या नोंदींमध्ये विसंगती आहेत किंवा ज्यांचे २००२ च्या मतदार यादीशी आवश्यक लिंकज सिद्ध होत नाही, अशा मतदारांसमोर पुढील टप्प्यात आपली पात्रता सिद्ध करण्याचे आव्हान आहे.
‘वगळली जाणारी नावे’ म्हणजे फॉर्म उपलब्ध न झालेला किंवा संकलित न झालेला मतदार, आणि त्यानंतरच्या पुनरावलोकन, दावे-हरकती व सुनावणी प्रक्रियेत अंतिम निर्णय होणार आहे. या बाबतच्या हरकती ,दावे या बाबतची निर्णय ३१ ऑगस्ट २०२६ ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पुर्ण करण्यात येईल.
ही कार्यवाही पूर्ण झाल्या नंतर निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील.
मुंबई महानगर प्रदेशातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये अनकलेक्टेबले मतदारांचे प्रमाण राज्याच्या सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. यामागे स्थलांतरित लोकसंख्या, भाडेकरू नागरिक, वारंवार बदलणारे पत्ते, झोपडपट्टी आणि अनधिकृत वस्त्यांमधील निवास नोंदी, तसेच एका शहरात राहून दुसऱ्या ठिकाणी मतदार म्हणून नोंद असण्यासारखे घटक कारणीभूत असू शकतात.