

भारत चोगले
श्रीवर्धन : श्रीवर्धन शहरासह रानवली, निगडी, बापवन व गालसुरे परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या रानवली लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत असलेल्या जलवाहिन्या वारंवार फुटत असल्याने संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या समस्येमुळे नळजोडणीधारक नागरिकांना पाणीटंचाई, गढूळ पाणी व अनियमित पुरवठ्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
1977 साली रानवली ग्रामपंचायत हद्दीत मातीचे पाझर धरण उभारण्यात आले होते. सुमारे 700 मीटर लांबी, 2.50 मीटर उंची व 121 मीटर पूर्ण संचय पातळी असलेल्या या धरणाला नैसर्गिक जलस्त्रोत नसून, केवळ पावसाळ्यात साठणाऱ्या पाण्यावर संपूर्ण वर्षाचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. श्रीवर्धन नगरपरिषद हद्दीत सुमारे 2,570 घरांना नळजोडणी देण्यात आली आहे.
2022-23 या कालावधीत रानवली धरण परिसरात सुमारे 23 कोटी रुपये खर्चाचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पांतर्गत 46 वर्षे वापरात असलेल्या जुन्या जलवाहिन्या काढून त्यांच्या जागी उच्च घनतेच्या पॉलिथिलीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या. या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा 2023 साली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला होता. मात्र, प्रकल्प पूर्ण होऊन अल्प कालावधी लोटत नाही तोच रानवली ते श्रीवर्धन या सुमारे 8 किलोमीटर अंतरावर जलवाहिनी फुटण्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. विशेषतः पावसाळी काळात नळांमधून गढूळ पाणी येणे, अनेक वेळा पाणीपुरवठा पूर्णतः बंद ठेवणे, तसेच फुटलेल्या जलवाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर साचणे, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
वारंवार होणाऱ्या जलवाहिनी फुटीमुळे होणारे पाण्याचे नुकसान, त्याचा आर्थिक भार आणि त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार, हा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. “वाया जाणाऱ्या पाण्याचा हिशेब नगरपरिषद स्वतः भरणार की त्याचा भार नागरिकांवर टाकला जाणार?” असा सवाल श्रीवर्धनवासीय करत आहेत.
या पार्श्वभूमीवर, जलवाहिन्यांची गुणवत्ता तपासणी, दुरुस्तीचे निकष, दोषी कंत्राटदारांवर कारवाई, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी स्वतंत्र तांत्रिक यंत्रणा उभारणे, या बाबींकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. अन्यथा श्रीवर्धनचा पाणीपुरवठा प्रश्न येत्या काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.