Raigad Sakharchauth Ganeshotsav: यंदा 'अंगारकी'च्या दुर्मिळ योगावर रंगणार 'साखरचौथ' गणेशोत्सव

रायगडात बाप्पाच्या स्वागताची अभूतपूर्व तयारी
Raigad Sakharchauth Ganeshotsav
Raigad Sakharchauth GaneshotsavPudhari
Published on: 
Updated on: 

रायगड: भाद्रपद महिन्यातील अनंत चतुर्दशीला सर्वत्र गणेशमूर्तींचे थाटामाटात विसर्जन पार पडल्यानंतर आता रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा उत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्यातील पेण, उरण, अलिबाग, पनवेल आणि कर्जत-खालापूर परिसरात अत्यंत श्रद्धेने साजरा केला जाणारा 'साखरचौथ गणेशोत्सव' यंदा एका विशेष कारणामुळे अधिक महत्त्वाचा ठरणार आहे.

यंदाची ही साखरचौथ 'अंगारकी संकष्टी चतुर्थी' च्या अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योगावर आल्यामुळे भाविकांमध्ये अनन्यसाधारण उत्साह पाहायला मिळत आहे.

मंगळवारच्या दिवशी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला 'अंगारकी चतुर्थी' म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा-अर्चा केल्याने वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थींचे पुण्य लाभते आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात.

यंदा साखरचौथ गणेशोत्सवाची स्थापनाच या अंगारकीच्या पावन योगावर होत असल्याने रायगड जिल्ह्यातील घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांमध्ये पूजेची विशेष तयारी करण्यात येत आहे.

Raigad Sakharchauth Ganeshotsav
Sanjay Raut Letter: एफडीएच्या कारवाईमुळे अधिकार्‍यांचे रेटकार्ड वाढले; संजय राऊत यांचे तुकाराम मुंढे यांना पत्र

पेण हे शहर जगप्रसिद्ध गणेशमूर्तींचे मुख्य केंद्र मानले जाते. भाद्रपद चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात स्थानिक मूर्तिकार आणि त्यांचे कुटुंबीय भाविकांच्या मूर्ती घडवण्यात व त्या वितरित करण्यात अहोरात्र व्यस्त असतात. या कामाच्या व्यापामुळे स्वतःच्या घरात भाद्रपद चतुर्थीला बाप्पाची स्थापना करणे या मूर्तिकारांना शक्य होत नसे.

यावर मार्ग म्हणून अनंत चतुर्दशीला इतर सर्व मूर्तींचे विसर्जन पार पडल्यानंतर येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला मूर्तिकारांनी कामे आटोपून अत्यंत शांत वातावरणात आपापल्या घरी गणपतीची स्थापना करण्यास सुरुवात केली. या परंपरेने हळूहळू संपूर्ण रायगड जिल्ह्यात, विशेषतः आगरी, कोळी व स्थानिक शेतकरी समाजात व्यापक आणि कौटुंबिक स्वरूप धारण केले.

या चतुर्थीला 'साखरचौथ' नाव पडण्यामागे खास खाद्यसंस्कृतीचा संदर्भ आहे. या दिवशी बाप्पाला अर्पण केला जाणारा मुख्य नैवेद्य साखरेपासून बनवलेला असतो. विशेषतः साखर आणि सुक्या खोबऱ्याचे सारण भरलेले मोदक, साखरेच्या पोळ्या आणि विविध गोड पदार्थांचा महानैवेद्य श्रीगणेशाला दाखवला जातो. यंदा अंगारकीचा योग असल्याने नैवेद्य आणि पूजेचा थाट आणखीच विशेष असणार आहे.

साखरचौथीचे हे गणपती साधारणपणे दीड दिवस, अडीच दिवस किंवा पाच दिवसांच्या कालावधीसाठी विराजमान होतात. काही पारंपरिक जुन्या घरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये २१ दिवसांचे गणपतीही या काळात पुजले जातात.

अनंत चतुर्दशीच्या विसर्जन सोहळ्यानंतर संपूर्ण वातावरणात आलेली शांतता दूर सारून साखरचौथीच्या निमित्ताने रायगडमधील ग्रामीण व शहरी भागात पुन्हा एकदा भक्तीमय आनंद पसरतो. या काळात ठिकठिकाणी भजन, कीर्तन, आयोजन केले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news