

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे धडाकेबाज काम करत आहेत. माझा तुकाराम मुंढेंवर आक्षेप नाही. पण त्याच कारवाईच्या नावाने अधिकारी हॉटेल मालकांकडून वसुली करत आहेत.
आता अधिकाऱ्यांचे रेट कार्ड वाढले असून मुंढे एफडीएत येण्यापूर्वी १२ हजार रुपये घेवून क्लोजिंग नोटीस बंद केली जात असे त्याचा दर आता दोन लाखांपर्यंत पोचला असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तुकाराम मुंडे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईने भेसळयुक्त दूध, अनालॉग पनीर आदी पदार्थ भेसळमुक्त जनतेला मिळू लागले आहेत. याबद्दल तुकाराम मुंढे यांचे कौतुक केले पाहिजे, असे राऊत म्हणाले.
मात्र एफडीएमधील सहाय्यक आयुक्त आणि एफएसओ या दर्जाचे अधिकारी हॉटेल, रेस्टॉरंट, क्विक कॉमर्स कंपन्यांना परवाना रद्द करण्याची धमकी देऊन पैसे उकळत आहेत. मुंढे या विभागात येण्याआधी क्लोजिंग नोटीस बंद करण्याचा दर दहा ते बारा हजार रुपये होता, आता हा दर ७५ हजार ते २ लाख रुपयांपर्यंत झाला आहे.
ठाण्यातील एका अधिकाऱ्याने एका क्विक कॉमर्स कंपनीकडून परवाना बहाल करण्यासाठी १७ लाख घेतले. एफडीएचे वांद्रे मुख्यालय आणि ठाणे कार्यालयाचा तिसरा मजला हा लुटीचा मुख्य अड्डा आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
मोठ्या कंपन्यांना सूट
फार्मा कंपन्या भाजपला हजारो कोटींच्या देणग्या देतात म्हणून त्यांच्यावर कारवाई होत नाही. फक्त छोट्या व्यावसायिकांवर बडगा आहे, असा आरोप राऊत यांनी केला. तुकाराम मुंढे यांना पत्र पाठवले असून तीच तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवली आहे, असे राऊत म्हणाले.