

आनंद सकपाळ
नेरळ : सोलापूर - मुंबई या धावत्या एक्स्प्रेसमधील गर्भवती महिलेला प्रसुतीचा त्रास सुरू होताच, त्याच एक्स्प्रेस गाडीमधून प्रवास करीत असलेले डॉक्टर हे त्या गर्भवती महिलेच्या मदतीला धावत चालत्या एक्स्प्रेसमध्येच प्रसूतीचा निर्णय घेत त्या महिलेची प्रसूती यातनेतून सुटका केली आहे. या डॉक्टरांनी आपले डॉक्टर असल्याचे कर्तव्य निभावत एक प्रकारे माणुसकीचे दर्शन घडवले आहे. तर सुखरूप प्रसुतीनंतर महिला व नवजात बालिकेला नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
सोलापूर-मुंबई 2116 सिद्धेश्वर एक्स्प्रेस ही पहाटेच्या सुमारास कर्जत स्थानकामधूल मुंबईच्या दिशेने पुढील प्रवासाकरीता मार्गस्थ झाली असता, एक्स्प्रेस गाडीतून प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेवर आपत्कालीन प्रसंग ओढवत त्या महिलेला अचानक प्रसुतीचा त्रास सुरू झाल्याची घटना घडली. सदर घटने संदर्भातील माहिती ही तत्काळ रेल्वे हेल्पलाईनवर कळवण्यात आली. त्यानुसार नेरळ स्थानकावरील स्टेशन मास्तर रणजीत कुमार शर्मा यांना माहिती मिळताच प्रवासात असलेल्या गर्भवती महिलेला तातडीने वैद्यकीय मदतीची गरज आहे व तिला नेरळ स्थानकामध्ये उतरवून उपचारा करीता दवाखान्यात नेणे आवश्यक असल्याच्या गंभीर बाबीची दखल त्यांनी घेतली. मात्र एक्सप्रेस गाडी ही नेरळ स्थानक पोहचण्या आधी त्या गर्भवती महिलेच्या प्रसूतीच्या वेदना तीव्र स्वरूपाच्या असल्याने व तिची प्रकृती पाहता तिला त्या वेळी गाडीतून उतरवणे शक्य नसल्याने याच एक्सप्रेस गाडीमधून प्रवास करीत असलेले डॉक्टर प्रशांत बेगडे हे त्या महिलेच्या मदतीला पुढे सरसावले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी गाडीतच प्रसूती करण्याचा धाडसी निर्णय घेत त्या महिलेची प्रसुतीमधून सुखरूप सुटका केली आहे. सदर गर्भवती महिलेचे नाव दीक्षा बनसोडे असून, तीने एका नवजात बालिकेला जन्म दिला आहे.