

सोलापूर: भैय्या चौकातील शंभर वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक रेल्वे पूल रविवारी पाडला जाणार आहे. इंग्रजांनी या पुलाची उभारणी केल्याचे सर्वांना माहिती आहे. परंतु या पुलाच्या उभारणीत सोलापुरातील व्यक्तीचा मोठा सहभाग होता. इंग्रजांचे अधिकृत कॉन्ट्रॅक्टर व कोळशाचे व्यापारी असलेल्या हाजी हजरत खान यांनी हा पूल बांधला होता.
अल्पशिक्षित असलेल्या हाजी हजरत खान यांनी या पुलासह सोलापुरातील अनेक इमारती उभ्या केल्या आहेत. हाजी हजरत खान या अल्पशिक्षित व्यक्तीने सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. इंग्रजांकडून त्यांनी अनेक इमारती, पूल, रस्ते यांच्या बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट घेतले होते. सध्या ज्या पुलाची चर्चा सुरू आहे, तो भैय्या चौकातील ऐतिहासिक रेल्वे पूल हजरत खान यांनी बांधला आहे. त्यांच्या पुढच्या पिढीने त्यांच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत.
या पुलासह शहरातील अनेक इमारती बांधण्याचे कॉन्ट्रॅक्ट हाजी हजरत खान यांना मिळाले. त्यासाठी लागणारा दगड कुठून आणायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. त्यावेळी मोहोळ तालुक्यातील अर्जुनसोंड येथे 35 एकर जमीन घेऊन तिथे दगडखाण सुरू केली. तेथील दगड वापरुन या पुलासह अनेक इमारती उभ्या राहिल्या. इंग्रजांनी पूल बांधताना तो शंभर वर्ष टिकेल असा बांधण्यासाठी ज्या काही नियम व अटी घातल्या होत्या, त्यामध्ये हजरत खान हे संपूर्णपणे खरे उतरल्याचे दिसते. पूल पाडण्यात येत असला तरी तो अजूनही मजबूत स्थितीत होता. त्यामुळे त्यावेळची कामाची क्वालिटी कशी होती, याचा प्रत्यय या पुलाच्या बांधकामामधून येतो.
हाजी हजरत खान हे मूळचे सोलापूरचे
हाजी हजरत खान हे मूळचे सोलापूरचे. 1941 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांना पाच भाऊ होते. त्यातील कादर खान हे त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्टरचे काम करीत असत. हाजी हजरत खान यांना पाच मुले व एक मुलगी. पाचही मुले सोलापुरात वास्तव्यास होती. त्यांची पाचवी पिढी सध्या फौजदार चावडी समोरील खान बंगल्यात रहात आहे. इंग्रजांच्या काळात गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करताना हाजी हजरत खान यांनी मोठी संपत्ती त्याकाळी कमावली. फौजदार चावडी परिसरातील संपूर्ण परिसर, भागवत थिएटर आणि त्यामागील सर्व परिसर, चार हुतात्मा पुतळ्यासमोरील सर्व परिसर, हिराचंद नेमचंद वाचनालयापासून ते सरस्वती चौकापर्यंतचा परिसर तसेच लकी चौकातील जुने गुजराती हॉटेल म्हणजे आताचे सपाटे यांचे शिवपार्वती हॉटेल या सर्व जागा हाजी हजरत खान यांच्या मालकीच्या होत्या. त्याचबरोबर हत्तूर येथे एक हजार एकर जमीन होती.