

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील साजगाव आणि वरसोली येथील यात्रा नुकत्याच संपल्या आहेत. दत्त जयंती निमित्ताने गुरुवारी ठिकठिकाणी पुन्हा जत्रोत्सव सुरू झाला आहे. या जत्रोत्सवाद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना स्वस्त आणि दर्जेदार खरेदीची संधी मिळणार आहे. पुढील पाच दिवसात सुमारे एक कोटींपेक्षा अधिकची उलाढाल होण्यासह हजारोंना रोजगारही मिळणार आहे.
ग्रामीण भागातील जत्रा म्हटल्यावर डोळ्यांसमोर खेळणी, खाण्याच्या गाळ्या, सेल्फी स्टिक्स, गॉगल यांचे फिरते विक्रेते येतात. अगदी कानातलेपासून मोबाइल कव्हरपर्यंतच्या वस्तू या ठिकाणी सहज उपलब्ध होतात. त्याचबरोबर मनोरंजनासाठी आकाश पाळणे, नागमोडी खेळ, मिकी माऊससारख्या विविध खेळण्यांनी चौल गावाचा परिसर गजबजलेला आहे. लाखांच्या घरात पाच दिवस उड्डाण करणाऱ्या अलिबाग तालुक्यातील चौल येथील दत्त मंदीरातील यात्रेला तरुणाईसह मध्यमवर्गीयांकडूनही त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
येथे खेळणी, फुगे, पिपाण्या, कानातले विकणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांची गर्दी असते. एका बाजूला खाद्यपदार्थांच्या गाळ्यांवर मोठी गर्दी जमलेली असते. एखाद्या ठिकाणी दोन मिनिटे थांबल्यानंतर कोणता पदार्थ चविष्ट आहे, यावर चर्चा ऐकू येतात. जिल्ह्यात दत्तजयंतीपासून ठिकठिकाणी जत्रोत्सवांचा माहोल दिसून येत असून यातून स्थानिकांनाही रोजगार मिळत आहे.
मातीची खेळणी पडद्याआड
लहान मुलांना कोणत्याही खेळण्यांचा प्रचंड आकर्षण असतो; पण सध्या बाजारात प्लास्टिकच्या विविध आकाराच्या खेळण्यांची विक्री जास्त असल्याने जत्रेत मातीची खेळणी दिसत नाहीत.
मागील वर्षी जत्रेत आमचे मिठाईचे दुकान होते. त्यावेळी आम्हाला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळीही जत्रोत्सवातून नफा होईल अशा अपेक्षेने आम्ही पुन्हा एकदा आमचे दुकान लावले आहे.
आशिष कंटक, मिठाईवाले
आम्ही पार्ल्यामध्ये नेहमीच जत्रा अनुभवतो, पण गावच्या जत्रेची वेगळीच ओढ कायम असते. दिवाळी झाल्यावर जत्रोत्सवासाठी आम्ही दरवर्षी गावाकडे येतो. पाच दिवस जत्रेत फिरून त्यातील नाविण्य अनुभवतो.
संध्या सावंत, जत्रेकरू