

उरण ः एकीकडे रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढत असताना, मुंबईला जोडणारा दुसरा महत्त्वाचा दुवा, म्हणजेच जलवाहतूक सेवा मात्र ठप्प झाली आहे. उरण येथील भाऊचा धक्का ते मुंबई (भाऊचा धक्का) या मार्गावरील प्रवासी लॉन्च सेवा चार दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे.
मोरा बंदरात समुद्राची ओहोटी आणि साचलेल्या गाळामुळे लॉन्च सेवा चालवणाऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. बुधवारी दुपारनंतर (3 डिसेंबर ) सागरी मार्गावरील लॉन्च वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही बंदी सोमवार, 6 डिसेंबर 2025 पर्यंत कायम राहणार आहे.
या मार्गावर दररोज हजारो चाकरमानी नोकरीसाठी प्रवास करतात. सेवा बंद झाल्यामुळे त्यांना रस्ते मार्गे लांबचा प्रवास करावा लागणार असून, त्यांची मोठी गैरसोय झाली आहे. ओहोटी आणि गाळाच्या समस्येमुळे अनेक वर्षांपासून ठराविक कालावधीसाठी ही वाहतूक बंद ठेवावी लागते. कोट्यवधी रुपये खर्च करूनही गाळाची समस्या अजूनही कायम आहे. या महत्त्वाच्या मार्गाची दुरुस्ती तातडीने पूर्ण करून जलवाहतूक सेवा लवकरात लवकर पूर्ववत करावी, अशी मागणी प्रवासी संघटना व स्थानिक नागरिकांनी केली आहे.