

इलियास ढोकले
नाते ः किल्ले रायगडावर जाण्यासाठी हिरकणी वाडी येथे उभारण्यात आलेला रायगड रोप वे प्रकल्पाचे बांधकाम शासनाच्या परवानगीनुसारच असून या ठिकाणी कोणतीही अनधिकृत बांधकाम करण्यात आला नसल्याचा दावा रोपवे प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
या संदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या पत्रात रोपवे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की,हिंदवी स्वराज्याची राजधानी असणार्या किल्ले रायगडावर अबाल शिवभक्तांना जाण्यासाठी 1996 मध्ये निर्माण करण्यात आलेला रायगड रोपवे प्रकल्पाचे मागील 30 वर्षापासूनचे असलेले बांधकाम हे पूर्णपणे केंद्रीय पुरातत्व विभागाची परवानगी घेऊनच करण्यात आले आहे.
केंद्रीय पुरातत्व विभागाने मागील वर्षी रायगडासह अन्य 11 किल्ल्यांचा युनोस्कोच्या वारसास्थळ यादीमध्ये समावेश केल्यानंतर किल्ले परिसरातील कामांना ऐतिहासिक पद्धतीने निर्माण केले जावे असे स्पष्ट केले होते. त्यानुसारच तीस वर्षांपूर्वी झालेल्या बांधकामाला बाहेरून ऐतिहासिक पद्धतीने निर्माण केले गेले असल्याचे प्रशासनाने नमूद केले असून कोणतेही अतिरिक्त व अनधिकृत बांधकाम करण्यात आले नसल्याचे या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे. किल्ले रायगड व हिरकणी वाडी येथील रोपवे प्रकल्पाच्या बांधकामासंदर्भात प्रसार माध्यमातून व्यक्त होणार्या अनधीकृत बांधकामाबाबत रोपवे प्रशासनाने केंद्रीय पुरातत्व विभागाने दिलेल्या परवानगीचे पत्र जोडले असून यामध्ये सध्या सुरू केलेल्या कामांना देखील परवानगी दिल्याचे निदर्शनास आणले आहे.
रायगड रोपवे प्रकल्प 4 एप्रिल 1996 रोजी अस्तित्वात आला. ज्या गडावर वर्षाकाठी केवळ दहा हजार शिवभक्त येऊ शकत होते त्याच गडावर आज लाखो शिवभक्त या प्रकल्पाच्या माध्यमातून शिवरायांच्या पवित्र समाधीचे दर्शन सुलभतेने घेऊ शकत असल्याचे नमूद करून यामुळे राष्ट्र प्रेमाची दीक्षाही सर्वांना प्राप्त होत असल्याचे म्हटले आहे. या लाखो शिवभक्तांमध्ये असे आबाल वृद्ध दिव्यांग आहेत की ज्यांना अन्यथा हे दर्शन स्वप्नवत राहिले असते असे निदर्शनास आणले आहे. रोपवे कंपनीने विनापरवाना हॉटेल रेस्टॉरंट कॅफे उभारल्या बाबतचे केलेले आरोप निखालच खोटे असून असे कोणतेही बांधकाम रोपवे कंपनीने केले नसल्याचे नमूद करून पुरातत्त्व खात्याच्या पूर्वपरवानगीनेच ही कामे केली गेल्याचे नमूद केले आहे.
रोपवे कंपनीने केलेल्या कामात काँक्रीटचा वापर करण्यात आला नसून पूर्वी उभारलेल्या रोपे लँडिंग स्टेशनच्या शेडचे गोल स्टील फ्रेम चौकोनी करून त्यावर सिमेंटचे तक्ते लावण्यात आले, त्यावर शिवकालीन वास्तूचे स्वरूप यावे म्हणून एफआरपीचे डिझाईन चिकटवण्यात आले असल्याचे नमूद केले आहे. प्रशासनाने या बांधकामा संदर्भात सर्व परवानग्या घेऊनच नियमांच्या अंतर्गत राहून कामे केली असून केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी अथवा इतर कोणत्याही शासकीय यंत्रणेने रोपवेच झुकते माप दिले असल्याचे अथवा नियमबाह्य कार्य झाले असे नसल्याचे नमूद करून सर्वसामान्य शिवभक्तांची या प्रकारामुळे दिशाभूल होऊ शकते. यामुळे गैरसमज पसरू शकतो हे लक्षात घेऊन रोपवे प्रशासन हे स्पष्टीकरण देत असल्याचे अखेरीस आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या अथक प्रयत्नातून किल्ले रायगड व इतर 11 किल्ल्यांना जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने यासंदर्भात आयसीओएमओएस या जागतिक संस्थेचे अधिकारी, रायगड जिल्हाधिकारी तसेच केंद्रीय पुरातत्व विभागाच्या पर्यटन विभागाच्या अधिकार्यांना रोपवेच्या इमारती ऐतिहासिक काळाशी अनुरूप अशा दिसतील यावर विचार करावा अशा सूचना केंद्रीय पुरातत्व खात्यास केल्या आहेत. त्यास अनुसरून त्या खात्याकडून पूर्वीच दिलेल्या परवानगीचा वापर करून रोपवे कंपनी अस्तित्वात असलेल्या इमारतींचे बाह्य स्वरूप शिवकालीन अथवा त्या काळातील वास्तू सारखे करावे या संदर्भात विचारणा करण्यात आली होती, त्यास सकारात्मक प्रतिसाद देऊन या सर्व वास्तूंचे बाह्य स्वरूप बदलण्याचा निर्णय घेऊन ते युद्ध पातळीवर हाती घेण्यात आल्याचे रोपवे प्रशासनाने नमूद केले आहे.