कर्जत : कर्जत तालुक्यातील कळंब गावाच्या हद्दीतून पाच गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी नेली जात होती. स्थानिक गोरक्षक यांनी त्या जनावरांबद्दल संशय आला त्यांनी लगेचच कळंब पोलिसांना माहिती दिली आणि त्यामुळे त्या जनावरांची कत्तल थांबली आहे. दरम्यान, नेरळ पोलीस ठाण्याच्या कळंब आऊटपोस्टमधील पोलिसांच्या सतर्कतेमुळे चार तरुणांना ताब्यात घेतले असून त्यातील तीन तरुण आदिवासी आहेत.
बोरगाव येथून कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रा जवळील रस्त्याने पाच गोवंशिय जनावरे नेली जात असताना तेथील एका गोरक्षकाने विचारणा केली. त्यावेळी एका तरुणाने साळोख येथे बैलांना घेवून चाललो आहोत, असे सांगितल्याने गोरक्षकाला संशय आला. त्यामुळे त्या गोरक्षकाने आपल्या मित्रांना फोनवर संपर्क साधून आणि आपल्या सोशल मीडिया ग्रुपवर माहिती दिली. त्यानंतर काही गोरक्षक तरुण तत्काळ कळंब आऊट पोस्ट पोलीस ठाणे येथे पोहचले. तेथे ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी तत्काळ बोरगाव फाटा येथे धाव घेतली. मात्र तेथे कोणीही व्यक्ती बैल घेवून जात नसल्याने पोलीस आणि गोरक्षक यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जावून पाहणी केली. त्यावेळी पाच गोवंशिय बैल हे आडवाटेने साळोख गावाकडे जात असल्याचे दिसले. पाऊस असल्याने गवताच्या रस्त्याने ते चार तरुण पाच जनावरे यांना घेवून पुढे जात होते. गोरक्षक आणि पोलीस तेथे पोहचले आणि त्यांना विचारणा केली असता कत्तलीसाठी बैलांना नेत आहेत काय? या प्रश्नावर चारही तरुणाची बोबडी वळली.
त्यामुळे पायी आडवाटेने बैल घेवून जाणार्या त्या चार तरुण तसेच पाच बैलांना घेवून गोरक्षक आणि पोलीस हे कळंब आऊट पोस्ट येथे पोहचले. त्यावेळी अधिक चौकशी केली असता बोरगाव भागातून ते बैल आणले असल्याचे निष्पन्न झाले असून कत्तलीसाठी सालोख येथे घेवून चाललो असल्याचे कबूल केले आहे.
त्यामुळे त्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते पाच बैल यांना पोलीस ठाण्याचे मागे पोलिसांच्या देखरेखीखाली बांधून ठेवण्यात आले आहे. त्यातील चार बैल हे साधारण प्रत्येकी वीस हजार रुपये किमतीचे असून अन्य एक बैल पंचवीस हजार रुपये किमतीचा आहे. पोलिसांनी कत्तलीसाठी बैल नेत असल्या प्रकरणी तसेच अवैध प्रकारे वाहतूक केली जात असल्याने आणि आरोग्य तपासणी तसेच त्या बैलांची खरेदी केल्याची कोणतेही प्रमाणपत्र नसल्याने चोरी करून त्या बैलांना कत्तलीसाठी नेले जात असल्याचे उघड झाले आहे. त्याबाबत नेरळ येथील सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे हे तत्काळ कळंब येथे पोहचले.
पोलिसांनी त्या चार तरुणांवर गुन्हा दाखल केला असून साळोख गावातील शगफ बुबेरे, अजय चंद्रकांत चवर, मनेश अशोक वाघ आणि चौथा अल्पवयीन बालक असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलीस कर्मचारी विजय कोंडार यांच्या फिर्यादीनुसार गोवंशिय बैलांची अवैध तस्करी केल्याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2), 3(5), सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम चे कलम 5(ब), 9 चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उप निरीक्षक वसावे करीत आहेत.