Raigad Rain Update | पावसामुळे रायगडात 37 कुटुंबांचे स्थलांतर

24 घरांचे नुकसान, 8 गोठ्यांची पडझड
Raigad Rain Update
मुसळधार पावसाने पोलादपूर शहरातील जनावरांचा गोठा कोसळला.pudhari photo

रायगड : रायगडात गेल्या दोन दिवसात कोसळलेल्या मुसळधार पावसाने तळा आणि मुरुड तालुक्यातील 37 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले तर ठिकठिकाणी झालेल्या पडझडीत 24 घरांचे आणि 8 गोठ्यांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारी पावसाचा जोर पूर्णपणे ओसरला होता. मात्र,पुढील द दोन दिवसांनी पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

  • सोमवारी पावसाने रायगड जिल्हयात थैमान घातले.

  • सोमवारप्रमाणेच मंगळवारीही पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला होता.

  • त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.

  • शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात होती.

  • मात्र मंगळवारी पावसाने सर्वांनाच हुलकावणी दिली.

  • १२ जुलै ते १३ जुलैसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

येत्या बुधवार व गुरुवारसाठी यलो तर त्यापुढील दोन दिवसांसाठी पावसाचा ऑरेंड अलर्ट देण्यात आला असल्याने पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात 25 घरांचा नुकसान झाले आहे. तर दरडींच्या भीतीमुळे तळा आणि मुरुड तालुक्यातील 37 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. सोमवारीसाठी हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला होता. त्याप्रमाणे जिल्हयातील काही तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. अलिबाग तालुक्यात नदी किनार्‍यावरील 35 ते 40 घरांमध्ये पुराचे पाणी घुसले होते. अलिबाग-रोहा मार्गावर पाणी आल्याने वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. तर झाडे पडण्याच्या घटना घडल्या होत्या. मुरुड तालुक्यातही पुराचे पाणी वाढले होते. तालुक्यातील एक पूल खचला होता. महाडमध्ये रायगड किल्ल्यावर ढगफुटीप्रमाणे पाऊस झाल्याने तेथे पर्यटकांना 21 जुलैपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. पहाटेपासून मुसळधार पावसामुळे शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मंगळवारीही (9 जुलै) हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला होता, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या होत्या. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाना सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे शाळांच्या परिसरात शुकशुकाट होता. मात्र मंगळवारी पावसाने सर्वांनाच हुलकावणी दिली. मंगळवारी जिल्हयात मोठा पाऊस झालाच नाही.

दरडग्रस्त गावात खबरदारी

रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील कडक्याची गणी या दरडग्रस्त गावातील 19 कुटुंबातील 68 नागरिकांना पिटसई कुणबी हॉल येथे आपत्तीपूर्व उपाययोजनांच्या अनुषंगाने स्थलांतरीत करण्यांत आले आहेत. मुरुड तालुक्यातील राजपुरी येथील 18 कुटुंबातील 80 नागरीक त्यांचे नातेवाईकांकडे स्थलांतरीत झाले आहेत.

Raigad Rain Update
रायगड : पुराच्या पाण्यातून चालत येताना तरूणाचा व्हिडिओ व्हायरल!

म्हसळ्यात सर्वाधिक पाऊस

मंगळवारी सकाळी 8 पर्यंतच्या चोवीस तासाच्या अहवालानुसार म्हसळा 227 मि.मी., मुरुड- 215 मि.मी., अलिबाग-180 मि.मी., तळ- 167 मि.मी. उरण-150 मि.मी., रोहा-115 मि.मी., खालापूर-91 मि.मी. अशा सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. अन्य तालुक्यात पावसाचे याही पेक्षा कमी आहे.

मंगळवारी सांयकाळी पाचच्या अहवालानुसार जिल्हयातील सर्व नदयांची पाणी पातळी इशारा पातळी पेक्षा कमी होती.

रस्ता वाहतूक सुरळीत

जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाच्या माहितीप्रमाणे कोणत्याही आपत्तीजनक घटनेची नोंद नसून जिल्हयातील प्रमुख रस्ते व रेल्वे वाहतूक सुरळीत सुरु होते. सर्व नागरिकांना व शासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच एनडीआरएफचे पथक तैनात आहे.

१३ धरणे ओव्हरफ्लो

अतिवृष्टीमुळे मागील २४ तासांत १३ कच्च्या घरांचे अंशतः, ११ पक्क्‌या घरांचे अंशतः आणि १ कच्च्या घराचे पूर्णत नुकसान झाले आहे. तसेच ८ गोठ्यांचे नुकसान झाले आहे. २५ पशुधनाचेही नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून सुरु झाली आहे. जिल्ह्यातील लघुपाठबंधारे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या २८ धरणांपैकी १३ धरणे १०० टक्के भरली आहेत. उर्वरित धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत.

Raigad Rain Update
Raigad Police Recruitment | रायगड पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीवर पावसाचे पाणी

पुन्हा जोरदार पाऊस

मंगळवारी जरी पावसाचा जोर कमी असला तरी अद्यापही बुधवार आणि गुरुवारसाठी हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जाहीर केला आहे. तर त्यानंतर १२ जुलै ते १३ जुलैसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने दोन दिवसांनंतर पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाच्या अंदाजावरून दिसून येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news