

Raigad Bus Accident
पनवेल : मुंबईहून कोकणात निघालेली खासगी बस कर्नाळा घाटात वळण घेताना पलटी झाली. या अपघातात ३५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले. ही घटना रविवारी (दि.३) रात्री ११ वाजता कर्नाळा पक्षी अभयारण्य परिसरात घडली.
अपघातानंतर काहीकाळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी रात्रभर प्रयत्न करून मार्ग मोकळा केला. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस उलटली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
अपघातात एकाचा मृत्यू
जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार १४ जणांवर सध्या उपचार सुरू असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. एक प्रवासी उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात
कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि घाटपरिसर या पट्ट्यात अपघाताची शक्यता असते. वळण, अंधार अशा स्थितीत वाहन चालवताना चालकांनी दक्षता घ्यावी, अशा आशयाचे फलकही मार्गावर लावण्यात आले आहेत. मात्र, बसचालक याकडे दुर्लक्ष करतात, असे दिसते. रविवारी रात्री झालेल्या अपघातातही चालकाने भरधाव बसवरील नियंत्रण सुटले आणि अपघात घडला, असा प्राथमिक अंदाज आहे.