

अलिबाग : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी रायगड पोलिसांनी वाहतूक नियोजनाचा व्यापक आराखडा तयार केला आहे. मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ तसेच पालीफाटा-खोपोली-वाकण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ (अ) वर गणेशभक्तांच्या वाहनांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात महामार्गावरील वाहतूक कोंडी ही मोठी समस्या ठरू नये, यासाठी विशेष मोटारसायकल पथके तयार करण्यात आली आहेत. महामार्गावर दर दहा किलोमीटर अंतरासाठी दोन अंमलदारांसह एक मोटारसायकल गस्तीवर राहणार आहे. अशा एकूण ३० मोटारसायकली तैनात करण्यात येणार असून, वाहतूक कोंडी किंवा अपघाताची घटना घडल्यास चारचाकी वाहनांना पोहोचण्यास लागणारा वेळ वाचवून ही पथके तातडीने घटनास्थळी पोहोचतील. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून खारपाडा ते कशेडी या मुंबई-गोवा महामार्गावर १० सुविधा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. खारपाडा, खारपाले, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाड, महाड एमआयडीसी आणि पोलादपूर येथे ही केंद्रे सुरू राहणार आहेत. या ठिकाणी प्रवाशांना मोफत चहा, बिस्कीट, पाणी, सरबत आणि ओआरएस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्रत्येक सुविधा केंद्रावर वैद्यकीय कक्ष, आपत्कालीन उपचार व्यवस्था व रुग्णवाहिका, पोलीस मदत कक्ष, वाहन दुरुस्ती केंद्र, टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा, बालकांसाठी आहार कक्ष आणि महिलांसाठी फिडिंग कक्ष अशा सुविधा उपलब्ध असतील. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची माहिती देणारी फोटो गॅलरीही या केंद्रांवर उभारण्यात येणार आहे.
गणेशोत्सव काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. सुमारे १,९०० पोलीस अंमलदार, ५०० होमगार्ड तसेच एसआरपीएफची एक कंपनी आणि बाहेरील बंदोबस्तातील अधिकारी-अंमलदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र अंमलदार तैनात केले जाणार आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या ३६, मोहल्ला कमिटीच्या ३० आणि गणेश मंडळांच्या १२७ बैठका घेण्यात आल्या आहेत. तसेच १२५ गावांना भेटी देऊन पोलिसांनी मंडळे आणि नागरिकांना सूचना केल्या आहेत. संवेदनशील ठिकाणी दंगाकाबू पथक व रूट मार्चचेही नियोजन करण्यात आले आहे.
गणेशमूर्तींच्या विसर्जनाच्या विविध दिवसांनुसार स्वतंत्र बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून, गर्दीची ठिकाणे, विसर्जन घाट आणि महामार्गावरील वाहतूक यावर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ‘वाहतूक कोंडीमुक्त आणि सुरक्षित कोकण प्रवास’ हे पोलिसांसमोरील प्रमुख उद्दिष्ट असणार आहे.
प्रत्येक सुविधा केंद्रावर वैद्यकीय कक्ष, आपत्कालीन उपचार व्यवस्था व रुग्णवाहिका, पोलीस मदत कक्ष, वाहन दुरुस्ती केंद्र, टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा, बालकांसाठी आहार कक्ष आणि महिलांसाठी फिडिंग कक्ष अशा सुविधा उपलब्ध असतील. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची माहिती देणारी फोटो गॅलरीही या केंद्रांवर उभारण्यात येणार आहे.