

Raigad Crime Detection Rate
सुवर्णा दिवेकर
अलिबाग : रायगड जिल्ह्यात 2025 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांनी कमालीचे यश मिळवले आहे. चोरी, घरफोडी अपहरण असे वेगवेगळे तीन हजार 327 गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये तीन हजार 294 गुन्ह्यांची उकल करण्यास रायगड पोलिसांना यश आले आहे. सरासरी 99 टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली. 2024 मध्ये देखील गुन्हयाची उकल होण्याचे प्रमाण 99 टक्के इतके होते.
पोलीस मुख्यालयाच्या जंजिरा सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, अलिबागच्या पोलीस उपअधीक्षक माया मोरे आदी उपस्थित होते. वर्षभरात खुनाचे 32 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 30 गुन्हे उघडकीस आले आहेत. दरोड्याचे 3 गुन्हे दाखल झाले होते. हे तिन्ही गुन्हे उघडकीस आले आहेत. घरफोडीचे 271 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 173 गुन्हे उघडकीस केले आहेत
महिलांशी संबंधित गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीसांना चांगले यश आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. अत्याचाराचे 136 गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे सर्व गुन्हे उघड केले आहेत. त्यात 115 गुन्हे पोक्सो अंतर्गत केले आहेत. यात 100 टक्के गुन्हे उघडकीस आले असून 2024 च्या तुलनेत गुन्ह्यांच्या संख्येत 28 ने वाढ झाल्याचे दिसून येते. अपहरणाचे 121 गुन्हे दाखल करण्यात आले होते. 114 गुन्हे उघडकीस केले आहेत. विनयभंगांचे 156 गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 114 गुन्हे उघडकीस करण्यात यश आले आहे. रायगड जिल्ह्यात 115 ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापे टाकण्यात आले होते. त्या कारवाईत 56 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अंमली पदार्थ विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर 26 कारवाया झाल्या आहेत. त्यात एक कोटी 19 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.
सायबर पोलीस ठाण्यात 2025 मध्ये आठ गुन्हे दाखल झाले. या गुन्ह्यांमध्ये 2 कोटी 27 लाख 83 हजार 403 रूपयांची फसवणूक झाली आहे. त्यापैकी 40 लाख 85 हजार रूपये इतकी रक्कम फिर्यांदींना परत करण्यात आली. वर्षभरात 10 हजार 519 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. ही संख्या 2024 च्या तुलनेत 1 हजार 5 ने जास्त आहे.मुंबई पोलीस अधिनिसमान्वये रायगड जिलह्यातील 14 जणांना वर्षभरात हद्दपार करण्यात आले तर एमपीडीए कायद्यानुसार एकावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात गुन्हे शाबितीचे प्रमाण फार चांगले दिसत नसले तरी सत्र न्यायालयात दोषसिद्धीचे प्रमाण 20 टक्के तर प्रथमवर्ग न्यायालयात हे प्रमाण 60 टक्के इतके आहे. अनेकदा पंच साक्षीदार फितुर होत असल्याने दोषसिदधीवर त्याचा परीणाम होतो. पंच फितुरीमुळे साधारण 20.8 टक्के गुन्हयातील आरोपी निर्दोष सुटत असल्याचे पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी स्पष्ट केले.
मालमत्ता विषयक गुन्हयांमध्ये रायगड पोलीसांची कामगिरी लक्षणीय आहे. यामध्ये गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण घटले असले तरी उघड होण्याचे प्रमाण वाढले आहे. 2024 मध्ये 559 गुन्हे दाखल झाले होते त्यातील 306 उघड झाले. तर 2025 मध्ये दाखल झालेल्या 445 पैकी 295 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीसांना यश आले आहे. गुन्हयांची उकल होण्याचे प्रमाण 55 टक्क्यांवरून 66 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
हरवलेले मोबाईल शोधून संबंधितांना परत देण्यात रायगड पोलिसांची कामगिरी राज्यात अव्वल ठरली आहे. यासाठी पोलीस दलाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली. 2025 मध्ये हरवलेल्या 2 हजार 14 पैकी 1 हजार 90 मोबाईल फिर्यादींना परत करण्यात आले आहेत.