

Raigad Police Forensic Van
रायगड : गणेशागमनाच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांनी रायगडवासीयांना चांगली बातमी दिली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ लागू झाल्यानंतर पोलीस तपास प्रक्रियेत तांत्रिक अचूकता आणण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रायगड जिल्हा पोलीस ताफ्यात अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली आहे. परिणामी गुन्हे तपास गतीमान होणार आहे.
या व्हॅनमध्ये भौतिक, रासायनिक, जैविक व डिजिटल पुरावे खेळा करण्यासाठी आधुनिक साधनसामग्री (किट्स) उपलब्ध करून देण्यात आले असून प्रशिक्षित मनुष्यबळाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये ०४ असिस्टंट केमिकल अॅनालायझर, ०२ सायंटिफिक असिस्टंट तसेच व्हॅन चालकाचा समावेश आहे. रक्त, रसायने यांचे नमुने संकलन त्याच बरोबर मोबाईल, टॅब, लॅपटॉप, कॉम्प्यूटर यांच्यातील गुन्ह्यातील धागेदोरे तपासणीकरिता या व्हॅनमधील यंत्रणा व साहित्याचा उपयोग होतो.
गंभीर गुन्ह्यांच्या तपासात पुरावे गोळा करून ते न्यायालयासमोर सादर करण्यामध्ये ही व्हॅन महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणार आहे. आरोपींना शिक्षा होण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या मजबूत पुरावे उपलब्ध करून देणार आहे. या फॉरेन्सिक व्हॅनचे परिक्षण जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल तसेच अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी केले. रायगड जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात ही सुविधा उपलब्ध झाल्याने तपास प्रक्रियेत अचूकता, वेग आणि पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे. ही व्हॅन २४ तास कार्यरत राहणार आहे.