

Poladpur Taluka Cow Rescue Operation
पोलादपूर : तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात पाणीटंचाईची झळ तीव्र होत असताना आडाचीवाडी येथे एक अनोखी घटना घडली. पाण्याच्या शोधात विहिरीजवळ गेलेल्या गाईचा अपघाताने विहिरीत पडण्याचा प्रकार घडला; मात्र ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे त्या गाईला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
महालगुर परिसरातील आडाचीवाडी येथे शनिवारी (दि.२) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. येथील शेतकरी व माजी सरपंच विलास बाबू उतेकर यांच्या मालकीची गाय पाण्यासाठी विहिरीजवळ आली होती. विहिरीत कचरा पडू नये, म्हणून तिच्यावर हिरवे जाळे (नेट) टाकण्यात आले होते.
दरम्यान, त्या जाळ्यावर झाडावरून पडलेला आंबा दिसताच गाईला त्याचा मोह आवरता आला नाही. आंबा खाण्याच्या प्रयत्नात तिने जाळ्यावर उडी घेतली; मात्र तोल जाऊन ती थेट सुमारे ५० फूट खोल विहिरीत कोसळली.
सुदैवाने विहिरीत पाणी असल्याने गाईचा जीव वाचला. ही घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गाईला बाहेर काढणे हे मोठे आव्हान होते; तरीही ग्रामस्थांनी दोऱ्यांच्या सहाय्याने बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर गाईला सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढण्यात यश आले. ग्रामस्थांच्या समयसूचकतेमुळे आणि सहकार्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.