

रायगड: रायगड जिल्ह्यात काल, शनिवार (३ ऑक्टोबर) रोजी पनवेल तालुक्यातील नानोशी परिसरात सायंकाळी ६:३२ वाजण्याच्या सुमारास २.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा सौम्य धक्का बसला.
या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसली तरी, गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात सातत्याने जाणवणाऱ्या या सौम्य भूकंपांच्या सत्रामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान भुकंप लहरी तिन टप्प्यात असतात, त्यातील पनवेल तालुक्यांत नानोसी परिसरात जाणवलेल्या भुकंपाच्या लहरी या पृष्ठभागावरील (सर्फेस लेअर) मधील आहेत, परिणामी ती धोकादायक श्रेणीत येत नसल्याचे भूगोल तज्ज्ञ तथा पोलादपुरच्या एस.एम.कॉलेजच्या भूगोल विभागाचे प्रमुख डॉ.समीर बुटाला यांनी सांगीतले.
पनवेल तालुक्यातील नानोशी येथील घटनेनंतर स्थानिक महसूल अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हे धक्के अतिशय सौम्य स्वरूपाचे असल्याने नागरिकांनी अजिबात न घाबरता सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
कंपने जाणवल्यास नागरिकांनी घरातील मोकळ्या जागेत यावे किंवा मजबूत टेबलाखाली आसरा घ्यावा.जुन्या व कमकुवत इमारतींपासून सुरक्षित अंतर राखावे आणि केवळ अधिकृत प्रशासकीय माहितीवरच विश्वास ठेवावा.
दोन वर्षांतील पाचवा धक्का
गेल्या वर्षी २३ डिसेंबर २०२५ रोजी रायगड आणि लगतच्या खाडी परिसरात २.६ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद झाली होती. दरम्यान यावर्षी १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:४७ वाजता उरण ते चिरनेर मार्गावरील कोप्रोली गावाजवळ २.५ तीव्रतेचा धक्का नोंदवला गेला होता. २२ मे २०२६ रोजी सायंकाळी ७:४० वाजण्याच्या सुमारास अलिबाग शहराच्या उत्तरेस सुमारे ७.४ किलोमीटर अंतरावर २.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला होता अशा नोंदी आहेत.
भूकंपशास्त्रीय कारणे व तांत्रिक विश्लेषण
पश्चिम घाट आणि कोकण किनारपट्टीच्या भूगर्भात सूक्ष्म भूगर्भीय भेगा म्हणजेच मायक्रो-फॉल्ट्स अस्तित्वात आहेत. या भेगांमध्ये वेळोवेळी निर्माण होणाऱ्या अंतर्गत ताणतणावामुळे २ ते ३ रिश्टर स्केल तीव्रतेचे सौम्य धक्के बसतात.
रायगड जिल्ह्यात नोंदवल्या गेलेल्या भूकंपांचे केंद्र जमिनीपासून अवघ्या ५ किलोमीटर खोलीवर असल्याने कमी तीव्रता असूनही पृष्ठभागावर कंपन किंवा सौम्य आवाज नागरिकांना स्पष्ट जाणवतो. उरण, पनवेल आणि अलिबाग हे भाग किनारपट्टी व खाडी क्षेत्राजवळ असल्याने भूगर्भातील पाण्याच्या दबावात होणाऱ्या बदलांमुळे अशा प्रकारच्या सूक्ष्म भूकंपांची वारंवार नोंद होत असते.