

पनवेल: पुढारी वृत्तसेवा : पनवेल परिसरातील नवीन पनवेल व तालुक्यातील तारा गावाच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळ्या कारणावरून खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. खुनाच्या या दोन घटनामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपासाला सुरूवात केली आहे.
नवीन पनवेल येथे आपल्या पत्नीसह राहणारा ओमार फारूक मजुरीचे काम करत होता. तो मूळचा पश्चिम बंगाल येथील रहिवाशी आहे. त्याच्या मानेवर, गळ्यावर, तोंडावर धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला. नवीन पनवेल सेक्टर १८ मधील सिडको गार्डनजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. हा खून नवीन पनवेल परिसरात राहणाऱ्या पप्पू उर्फ शफिक उल अहमद याने केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पप्पूची आपल्या पत्नीवर वाईट नजर होती, ही माहिती ओमारला समजली होती. त्यामुळे पप्पूनेच ओमारचा खून केला असावा, असा संशय ओमारच्या पत्नीने व्यक्त केला आहे. या घटनेनंतर पप्पू फरार झाला असून त्याचा शोध खांदेश्वर पोलीस करीत आहेत.
तर दुसरी घटना तारा गावाच्या हद्दीत घडली आहे. लाल रंगाच्या कारमध्ये मागच्या सीटखाली मृतदेह कोंबलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली होती. पनवेल-पेण रोडवरील तारा गावच्या हद्दीत एका लाल रंगाची (एम एच १४ जीए ९५८५) ही गाडी कागदोपत्री पुणे जिल्ह्यातील तेजस प्रकाश साळवे यांच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे. ही गाडी एका फार्म हाऊससमोर गेल्या २ दिवसापासून उभी होती. या गाडीत पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. मृत पुरुषाच्या अंगावर टी शर्ट, जीन्स पॅन्ट, पायात स्पोर्ट्स शूज होते. संजय मारुती कार्ले (वय ४५, रा. तळेगाव दाभाडे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचा व्यवसाय असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी तपास सुरू केला आहे.
हेही वाचलंत का ?