Raigad paddy farming crisis : अतिवृष्टीमुळे रायगडातील भातशेती संकटात

शेतात पाणी साचल्याने भाताची तरारलेली रोपे कुजली
Raigad paddy farming crisis
Raigad paddy farming crisispudhari photo
Published on
Updated on

सुधागड : सुधागडसह जिल्ह्यात पावसामुळे संपूर्ण जिल्हा जलमय झाला आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, याचा सर्वाधिक फटका किनारपट्टीच्या आणि ग्रामीण भागातील शेती क्षेत्राला बसला आहे. डोंगररांगांमधून वाहून आलेले पाणी आणि नद्यांच्या पुराचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने संपूर्ण जिल्ह्यातील भातशेती पाण्याखाली गेली आहे. भाताची तररलेले रोपे कुजली आहेत. यामुळे वर्षभर संपूर्ण कुटुंबाची गुजराण करणाऱ्या बळीराजाचे डोळे ओले झाले आहेत.

पाऊस उशिरा आला मात्र उशिरा आलेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली. भाताची रोपे हिरवीगार होऊन तरारली होती. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीने या सर्व कष्टांवर पाणी फेरले आहे.

Raigad paddy farming crisis
Landslide | कोसळणारे डोंगर

सध्या शेतांना तळ्याचे स्वरूप आले असून तरारलेली भाताची कोवळी रोपे पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत. अनेक ठिकाणी पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने रोपे वाहून गेली आहेत, तर काही ठिकाणी सतत पाणी साचून राहिल्यामुळे ही रोपे कुजण्यास सुरुवात झाली आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकरी कमालीचा हवालदिल झाला आहे.

अनेक ठिकाणी शेतांचे बांध फुटल्याने माती वाहून गेली आहे, ज्यामुळे जमीन नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आधीच महागडी बियाणे, खते आणि मजुरीचा खर्च करून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे कंबरडे या पुरामुळे पुरते मोडले आहे. प्रशासनाने कृषी विभागामार्फत तात्काळ ओल्या दुष्काळाची पाहणी करून बाधित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी तीव्र भावना संपूर्ण रायगड जिल्ह्यातून व्यक्त होत आहे.

Raigad paddy farming crisis
Pudhari Maha Icon 2026: मोटरसायकलीसाठी पेट्रोलची गरज नाही, इथेनॉलवर धावणार; गडकरींची घोषणा

कृषी विभागाकडून अनुदानावर बियाणे

शिवसेना (शिंदे गट) रायगड जिल्हा समन्वयक राजेंद्र राऊत यांनी सांगितले की, कृषी खात्याकडून ज्या शेतकऱ्यांची रोपे फुकट गेली आहेत, त्यांना पुनरपेरणीसाठी ७५% अनुदानावर नवीन बियाणे मिळणार आहे. परंतु, आता बियाणे पेरल्यानंतर लावणी आणि कापणीसाठी निसर्गाचा योग्य कालावधी मिळेल का, याचा विचार शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन त्यांनी केले आहे. हा कालावधी लक्षात घेऊन बाधित शेतकऱ्यांनी तातडीने कृषी खात्याकडे आपली नावे नोंदवावीत, जेणेकरून बियाण्यांचे वेळेत वाटप करता येईल. शासन या कठीण काळात बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे.

रोपे खूप छान तरारली होती आणि आता लावणीच्या कामांना वेग येणार होता. मात्र, या अतिवृष्टीने आमचे सर्व गणितच बिघडून टाकले. शेतांमध्ये अजूनही तीन ते चार फूट पाणी साचलेले आहे. डोळ्यांदेखत भाताची रोपे पाण्यात सडून चालली आहेत. पाणी ओसरले नाही, तर संपूर्ण वर्षभराचे पीक हातातून जाईल. शासनाने तातडीने या परिस्थितीची दखल घेऊन आमच्या नुकसानीचे पंचनामे करावेत आणि आर्थिक मदत द्यावी.

अरुण पाटील, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news