Raigad News | माणगावातील रिळे-पाचोळे येथील पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरले

शेकडो एकरावर निसर्गाची मुक्त हस्ते रंगांची उधळण; विविध प्रजातींच्या फुलपाखरांचे अस्तित्व
mangaon
माणगावातील रिळे-पाचोळे येथील पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरलेPudhari Photo
Published on
Updated on
माणगाव : कमलाकर होवाळ

माणगाव शहरापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावरील रिळे आणि पाचोळे या दोन गावांच्यामधील शेकडो एकर जमिनीच्या पठारावर निसर्गाने पिवळसर चादर ओढल्याचे जणू सोनेरी शालूला हिरवीगार किनार जोडली आहे. असे निसर्गरम्य चित्र दिसत आहे. रस्त्याच्या कडेला उभे राहून पाहिले तर अद्भूत निसर्गाच्या चमत्काराने नजरेत भरेल एवढे निसर्गाने मुक्तहस्ते सोन्याचा पित मुलामा देऊन उधळण केल्याच्या मनमोहक तरंग दिसतात.

संपूर्ण सपाट परीसरात सोनेरी-पिवळी छोटी- छोटीशी फुले लक्ष वेधून घेतात. ही छोटी फुले वार्‍यावर डोलताना सुंदर आणि रुपवान स्त्रीच्या साडीचा पदर हळूवारपणे अलगद पुढे सरकत असल्याचा भास होताना दिसत असतो. सुसाट वारा सुटला तर समुद्रातील लाटा अंगावर येत असल्याचा आनंद हा विरळाच म्हणावा लागेल. या परिसरात ही पिवळी बहारदार फुले कवळा या लहानग्या वनस्पतीची विखुरलेली आहेत. तसेच अनेक आकर्षक विविध प्रकारची फुले उगवलेली आहेत. रानभाज्या आणि औषधी भाज्या पहावयास मिळतात. विविध रंगांची फुलपाखरे येथे वावरताना दिसतात. शहरात असे दृश्य क्वचितच पाहायला मिळते. या जागेवर एकाच प्रकारची पिवळसर सोनेरी पैठणी गुंफून निसर्ग मातेने एकाच ठिकाणी नक्षीकाम केलेले पाहताना मन मोहवून गेल्याशिवाय राहत नाही. पहाटे आणि सकाळी या कोमल फुलांवर पडलेले दवबिंदू हे चकचकीत हिर्‍याच्या कोंदण पाडलेले सुंदर स्वप्न वाटते. या पावसाळ्यात पावसाचे थेंब पिवळी आणि हिरव्या पानांवर ओघळताना दिसल्यावर आई आपल्या लहानग्या बाळाला जणू आंघोळ घालताना जसे पाण्याचे तुषार आजूबाजूला उडताना दिसतात तसेच काहीसे चकचकीत पाणीदार हिरे-माणिक टपाटप पडताना दिसत असतात. त्यातच वार्‍याची मंद झुळूक अंगावर शहारे आणून मानवी शरीराला प्रसन्न करतात.

रिळे आणि पाचोळे गावाला निसर्गाने भरभरून दान दिल्याने या निसर्गरम्य परिसरात विविध प्रकारच्या जैवविविधता आढळून येते. सकाळी मोर आणि लांडोर या प्राण्यांच्या गोड आवाजाने निरव शांततेत अधिकच आनंदाची भावना होते.

mangaon
Raigad | माणगाव तालुक्यातील जोर गावात ढगफुटी

पर्यटनाला संधी

शासनाने या गावांकडे जाणार्‍या रस्त्याची उंची वाढवून रुंदीकरण केले तर हे निसर्गाचे वरदान आणि देणे पाहण्यासाठी पर्यटक सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत येथे येऊ शकतील. कारण ही निसर्ग संपदा आणि सौंदर्य याच काळात दिसते. तसेच येथील सूर्योदय शिवरायांच्या रायगड किल्ल्याचे दर्शन घडवून स्फुरण चढवते आणि सूर्यास्त मनाला समाधान देते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news