

पोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील बोरावले ग्रामपंचायतीवर निसर्गाचा मोठा आघात झाला आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मौजे घागरकोंड येथील नदीला अचानक पूर आला. या पुरामुळे बोरावले गावाच्या पाणीपुरवठ्याची मुख्य जलवाहिनी, साठवण टाकीवरील पंप, मोटार आणि संपूर्ण जॅकवेल व्यवस्था नदीच्या पाण्यात वाहून गेली.
घटनेनंतर संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. मात्र, पावसाळ्याच्या मध्यातच जलवाहिनी वाहून गेल्याने संपूर्ण गावाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गावकऱ्यांमध्ये यामुळे तीव्र नाराजी पसरली आहे.
ग्रामस्थांनी शासनाकडे तातडीने नवीन जलवाहिनी मंजूर करण्याची मागणी केली आहे. "पाणी ही आमच्या जीवनावश्यक गरज आहे. शासनाने तातडीने कारवाई करून नवीन जलवाहिनी मंजूर करावी," अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सध्या बोरावले गावात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना शेजारील गावांवर अवलंबून राहावे लागत आहे. पावसाळ्यात पुन्हा अशी आपत्ती ओढवू नये यासाठी कायमस्वरूपी आणि अधिक मजबूत जलवाहिनी प्रकल्प उभारण्याची गरज ग्रामस्थांनी अधोरेखित केली आहे. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नांनंतर शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.