

अलिबाग ः सुवर्णा दिवेकर
शेती आणि मासेमारी हा व्यवसाय असलेल्या रायगड जिल्ह्यात सध्या मासेमारीसाठी , बोटीवर जाण्यासाठी उत्तेर प्रदेश, बिहार येथील कामगार येतात. अवघ्या चार दिवसात मासेमारी बंदीचा हंगाम संपून पुन्हा एकदा बोटी समुद्रात मासेमारीसाठी निघतील. यासाठी साधारण 25 हजार उत्तरप्रदेश, बिहार या राज्यातील पुरुष कामगार येणार आहेत, तर मासळी वेगळी करणे, ती सुकत घालणे यासारख्या कामासाठी साधारण 5 हजार महिला कामगार काही दिवसातच जिल्ह्यात दाखल होतील.पहिल्यांदाच येत असणार्या कामगारांचे आधारकार्ड, रेशनकार्ड इत्यादी कागदपत्रांची नोंदणी करुनच कामावर घेण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाने दिले आहेत.
दोन महिन्याच्या बंदी नंतर मासेमारी हंगाम सुरु होण्यास काहीच दिवस उरलेले आहेत; समुद्र अद्याप खवळलेला आहे, उंच उंच लाटांचा मारा अद्याप कायम असल्याने मच्छीमार समुद्र शांत होण्याची वाट पहात आहेत. 1 ऑगस्टपासून मासेमारी हंगामाला सुरुवात करता येणे शक्य नाही, असे जिल्ह्यातील मच्छिमारांचे म्हणणे आहे. याच दरम्यान गावाकडे गेलेले कामगार बंदरात परत येऊ लागले आहेत. यामुळे बंदरात पुन्हा वर्दळ सुरु झाली आहे.
यातील काही कामगार कोकणात येतात, काम करण्याच्या होड्या ठरलेल्या असतात, काही कामगार नव्याने येत असल्याने त्यांची बायोमॅट्रिक ओळख पटण्यासाठी आधारकार्ड, बँकेचा पासबुक, पासपोर्ट साईज फोटो आणि ज्या गावातून आलेला आहे तेथील रहिवासी दाखला मत्स्यव्यवसाय विभाग, बंदर विभाग, सबंधीत मच्छिमारी सोसायटीकडे द्यावे लागणार आहे.
ज्याला मासेमारीचा अनुभव आहे त्या नाखवाला किमान 1500 रुपये पगार एका दिवसाचा पगार द्यावा लागतो, तर जाळी ओढणे यासारख्या इतर कामासाठी लागणार्या कामगारांना दिवसाला 1 हजार रुपये पगार बोट मालक देतो. या कामगारांचा जेवणाचा खर्चही बोट मालकालाच करावा लागतो. डोली मासेमारी 12 ते 15 सागरी मैल हद्दीत करताना आकाराने थोडीशी लहान असलेल्या या होडीवर किमान 5 कामगार लागतात. पर्सनेट मासेमारीची होडी थोडी मोठ्या आकाराची असते. पर्सनेट मासेमारी 15 सागरी मैलाच्या पलिकडे करतात. पर्सनेट मासेमारीसाठी साधारण 8 कामगार लागतात, एलईडी मासेमारीसाठी किमान 15 कामगारांची गरज असते. या मोठ्या होड्या समुद्रात गेल्यानंतर एक - दोन आठवडे परत येतच नाहीत.
या दरम्यानच्या मजुरांचा खर्च, त्यांचा पगार आणि होडीच्या इंधनाचा खर्च बोट मालकाच्या माथी पडतो. इतका खर्च करुनही मासळी मिळाली नाही तर कामगारांचे काहीही नुकसान होत नाही. परंतु मालकाला सर्व खर्च सोसावा लागतो. खोल समुद्रातील मासेमारीसाठी मच्छीमारांना 50 ते 70 वाव खोल समुद्रात जावे लागते. त्यासाठी एका ट्रीपसाठी 10 ते 12 दिवस खर्ची घालावे लागतात. मासेमारीच्या एका ट्रीपसाठी दीड ते दोन लाखांपर्यंत खर्च मच्छीमारांना येतो. समुद्रातील मासेमारीसाठी 15 दिवस आधीपासून तयारी सुरू झाली आहे. बोटींच्या डागडुजी, रंगरंगोटी, जाळींची दुरुस्ती करण्यासाठी मच्छीमारांची लगबग सुरू झाली आहे.
एखादया प्रकल्पाबाबत नेते मंडळी स्थानिकांना प्राधान्य द्या असे आवर्जून सांगतात मात्र रायगड जिल्ह्यातील बोटीवर मात्र परराज्यातील कामगार काम करीत आहेत. आपल्याच मुलांना प्रक्षिक्षण देऊन बोटीवर पाठवल्यास खर्च कमी होईल. मात्र तसे कोणी करत नाही.
1 ऑगस्टपासून बंदी संपलेली आहे, मासेमारीला केव्हा सुरुवात करायची हा निर्णय मच्छिमारांचा आहे, परंतु त्यापुर्वी होडीवर काम करण्यासाठी येणार्या कामगारांची नोंदणी करणे आवश्यक आहे. हे त्या कामगारासाठी आणि होडी मालकासाठीही चांगले ठरते, त्याचबरोबर ते सागरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे ठरते. या कामगारांची माहिती बंदर विभागाकडेही असणे आवश्यक आहे.
संजय पाटील, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रायगड-अलिबाग
कामगारांना संभाळणे खूपच कठीण आहे, आपल्याकडचे बापये होड्यांवर काम करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे होड्या असूनही मासेमारी करता येत नसल्याने मोठा नुकसान होतो. हे दुसर्या राज्यातील कामगार अधिक सोयीचे ठरतात. मे महिन्यात गावाला जाताना ते पुन्हा तुमच्याच होडीवर काम करण्यासाठी येणार असल्याची हमी देण्यासाठी बयाणा घेऊन जातात. नव्या हंगामात आल्यानंतर त्यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था करावी लागते.
राजेश नाखवा, मच्छीमार