

महाड : मागील १० ते १२ वर्षांमध्ये महाड औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग व्यवसायांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, गेल्या पाच वर्षात झालेले मोठे अपघात पाहता कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ब्ल्यूजेट कंपनीत उत्पादन सुरू करण्यास काळीज ग्रामपंचायतच्या सरपंचांनी विरोध केला होता. तरीही कंपनीने उत्पादन सुरू केले होते. त्यामुळे कंपनीतील ११ निष्पाप कामगारांचे प्राण गेले. या दुर्देवी घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १ कोटी, तर जखमींना ५० लाख देण्याची मागणी महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप-कामत यांनी केली.
जगताप- कामत आज (दि.४) त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते हनुमंत उर्फ नानासाहेब जगताप उपस्थित होते.
शुक्रवारी महाड वसाहतीतील ब्लू जेट केमिकल कंपनीमधील दुर्घटनेमध्ये ११ निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर शासकीय स्तरावरून तसेच कंपनी व्यवस्थापनाकडून हलगर्जीपणा करण्यात आला. कंपनीने क्यूनिन सल्फेट या रसायनाऐवजी क्लोरोक्यूनाइन फॉस्फेटचे उत्पादन घेतले. याबाबत व्यवस्थापनाने सखोल अहवाल व स्पष्टीकरण देण्याची मागणी जगताप-कामत यांनी यावेळी केली.
महाड औद्योगिक वसाहतीमध्ये एनडीआरएफ च्या धर्तीवर स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. मागील काही वर्षातील अपघातांच्या मालिका पाहता अशा पद्धतीची यंत्रणा आवश्यक असून प्रति महिन्याला या ठिकाणी भेटी देणाऱ्या फॅक्टरी इन्स्पेक्टर च्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
कंपनी संदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या कामाची सखोल चौकशी करण्याबाबत आपण सविस्तर लेखी पत्र शासनाला देणार आहे. तसेच या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या कंपनी व्यवस्थापनाविरोधात तसेच संबंधित शासकीय अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. कारखान्यांचे स्ट्रक्चर ऑडिट व संबंधित तपासणी करण्यात यावी, अशी मागणीही जगताप- कामत यांनी यावेळी केली.
हेही वाचा