पनवेल, पुढारी वृत्तसेवा: आरटीओ अधिकाऱ्याकडून दोन लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्षाला (Panvel NCP vice president) नेरुळ पोलिसांनी रंगेहात अटक केली. खंडणीच्या रक्कमेपैकी २० हजारांची रक्कम स्वीकारताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. कासम हासम मुलाणी (वय ५३, रा. तळोजा, पनवेल) असे अटक केलेल्या उपाध्यक्षाचे नाव आहे. या कारवाईनंतर मुलाणी यांना राष्ट्रवादी पक्षातून बडतर्फ केले आहे.
मुलाणी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पनवेल शहर जिल्हा उपाध्याक्ष (Panvel NCP vice president) पदावर सध्या कार्यरत आहे. तसेच ते एका रिक्षा संघटनेचा पदाधिकारी देखील आहे. मुलाणी यांनी नवी मुंबई आरटीओ कार्यालयात सहायक मोटार वाहन निरीक्षक पदावर कार्यरत असलेले कुणाल शेखर मोहिते या अधिकाऱ्याला धमकी देऊन २ लाखांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी नेरुळ पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. मोहिते सध्या नेरुळ येथील आरटीओ कार्यालयात कार्यरत आहे. मोहिते ऑगस्ट महिन्यात आरटीओ कार्यालया अंतर्गत ऑटो रिक्षा योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विभागात कार्यरत होते.
या वेळी ऑटो रिक्षाचे नूतनीकरणाचे काम करत असताना मुलाणी कार्यालयात गेले. आणि शुटींग करू लागले. तसेच त्यांनी नेरुळ येथील टेस्टिंग ट्रॅक वर येऊन देखील फोटो आणि व्हिडिओ शुटींग करून तुम्हाला धंद्याला लावतो. तसेच तुमच्या अब्रूला क्षती पोचावतो, अशी धमकी देऊन ते निघून गेले. त्यानंतर २६ ऑगस्टरोजी मोहिते यांना फोन करून २ लाखांची खंडणी मागितली. तसेच २० हजार रुपये महिन्याला देण्याची धमकी दिली.
याबाबतची माहिती मोहिते यांनी नेरूळ पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी आरटीओ कार्यालयाच्या बाहेर सापळा लावला. यावेळी मुलाणी यांना २० हजार रुपये रोख दिले. तसेच मोहिते यांनी मला २ लाख देणे जमणार नसल्याचे सांगितले. त्या वेळी संतापलेल्या मुलाणी यांनी मोहिते याना आज संध्याकाळ पर्यत १ लाख देण्याची धमकी दिली. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी मुलाणी याला अटक केली.
दरम्यान, या प्रकरणानंतर आज (दि. ५) दुपारी राष्ट्रवादी पक्षाचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष महादेव पाटील यांनी पत्रक काढून मुलाणी याला पक्षातून बडतर्फ करून सदस्य पद रद्द केल्याची माहिती दिली.