रायगड: रोहा- केळघर मार्गे मुरुड रस्ता धोकादायक; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

रायगड: रोहा- केळघर मार्गे मुरुड रस्ता धोकादायक; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
Published on
Updated on


रोहे, रायगड जिल्ह्यात मुरुड समुद्रकिनारा व जंजिरा किल्ला प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. येथे पुणे, तळकोकण, मुंबई, यासह परराज्यातून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. पर्यटक रोहा केळघर मार्गे मुरुडला जातात. हा रस्ता रोहा हद्दीपर्यंत चांगला आहे. पुढे हा रस्ता खराब आहे. आधीच एकेरी रस्ता असलेला हा रस्ता धनगरवाडी ते शिघ्रे गावांदरम्यान धोकादायक बनला आहे. रस्त्याच्या एका बाजूला साईडपट्टी चिखलयुक्त झाली असून काही ठिकाणी खचली आहे. काही ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. तात्पुरते फलक व रस्सी बांधलेली आहे. तरी हा रस्ता लवकरात लवकर दुरूस्त करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण रायगड जिल्हा सचिव अमोल पेणकर यांनी केली आहे.

रस्ता खचल्यामुळे दोन गाड्या पास होताना अडचण निर्माण होत आहे. हा रस्ता अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत मुरुड विभागात येत आहे. जिल्ह्याच्या अन्य भागातून येणाऱ्या नागरिकांसाठी हा जवळचा रस्ता असल्याने प्रवासी या रस्त्याला अधिक प्राधान्य देत असतात. मात्र, हा मार्ग जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन ठिकाणी खचला आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता धोकादायक बनला आहे. संभाव्य धोका लक्षात घेत मुरुड सार्वजनिक बांधकाम उपविभागाने गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणी प्रवाशांसह वाहन धारकांमधून होऊ लागली आहे.

मुरुड हे पर्यटकांचे आवडीचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. मुंबई पुण्याहून येणारा पर्यटक हा अलिबाग रेवदंडा व रोहा मार्गे मुरुड चा प्रवास करत असतो. यामध्ये रोहा कवळठे केळघर मार्गे मुरुड हा रस्ता जवळचा पडत असल्यामुळे सर्वाधिक पसंती या मार्गाला दिली जाते. या रस्त्यावरून रोहा केळघर मार्गे मुरुड एसटी सेवा सुरु असते. यातून मुरुड, तेलवडे, शिग्रे ,केळघर, कांटी बोडण या भागातील नागरिक, विद्यार्थी मुरुड, रोहाकडे प्रवास करतात.

कार्यकारी अभियंता अलिबाग जगदीश सुखदेवे यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत सर्व माहिती घेत पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले.जवळच आलेला गणेशोत्सव व त्यानंतर सुरु होणारा पर्यटन हंगाम लक्षात घेत तातडीने यासाठी राज्य शासनाने निधीची उपलब्धता करावी, व हा मार्ग प्रवासासाठी सुरक्षित करावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news