

कर्जत: दररोज मुंबईकडे प्रवास करणाऱ्या मध्य रेल्वेवरील कर्जत, नेरळ, भिवपुरी रोड, वांगणी, बदलापूर आणि परिसरातील हजारो रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने २० जुलैपासून आणखी १० उपनगरी लोकल गाड्या १२ डब्यांऐवजी १५ डब्यांसह चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विशेषतः कर्जत मार्गावरील प्रवाशांना गर्दीपासून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
मुंबई विभागाच्या ऑपरेशन शाखेने जारी केलेल्या प्रस्तावानुसार, ५ डाउन आणि ५ अप अशा एकूण १० लोकल सेवा १५ डब्यांच्या करण्यात येणार आहेत. यामुळे मुंबई मुख्य मार्गावरील १५ डब्यांच्या लोकल सेवांची संख्या २२ वरून थेट ३२ इतकी होणार आहे. मात्र, एकूण उपनगरी लोकल फेऱ्यांची संख्या पूर्वीप्रमाणेच १८२० राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कर्जतहून मुंबईकडे जाणाऱ्या सकाळच्या तसेच संध्याकाळी परतणाऱ्या प्रवाशांना वाढीव डब्यांचा मोठा फायदा होणार आहे. कार्यालयीन वेळेतील प्रचंड गर्दी, दरवाज्यातील जीवघेणा प्रवास आणि उभे राहण्यासाठीही जागा नसल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
कर्जत मार्गावरील वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करता हा निर्णय स्वागतार्ह असला, तरी सर्वच लोकल १५ डब्यांच्या करण्याची आणि गर्दीच्या वेळेत अधिक फेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून कायम आहे.
रेल्वे प्रशासनाने संबंधित विभागांना वाढीव १५ डब्यांच्या रेकची उपलब्धता, प्लॅटफॉर्मवरील सूचना, प्रवासी घोषणाबाजी आणि तांत्रिक बदल तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. १९ ते २० जुलैच्या मध्यरात्रीपासून नवीन 15 डब्यांचा रेक कार्यान्वित करण्यात येणार असून, २० जुलैपासून सुधारित सेवा सुरू होणार आहेत.