

Konkan Railway Train Fall Death
कोलाड : कोकण रेल्वे मार्गावर गोवे गावाच्या हद्दीत रेल्वेतून पडून एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार (दि. २८) सकाळी घडली. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून, कोलाड पोलिसांकडून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे ८.२६ वाजण्याच्या सुमारास मौजे गोवे गावाच्या हद्दीत कोकण रेल्वेच्या अप मार्गावर किलोमीटर क्रमांक ६/३१ ते ६/३३ दरम्यान रेल्वे पटरीवर एक व्यक्ती मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच कोलाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
मृत व्यक्तीचे अंदाजे वय ३० ते ३५ वर्षे असून, त्याचा रंग सावळा आहे. त्याने काळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली होती. मात्र, त्याच्याकडे ओळख पटविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे किंवा अन्य माहिती आढळून आली नसल्याने मृताची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
या घटनेची नोंद कोलाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिकदृष्ट्या रेल्वे अपघातात पडून मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के. एस. नागे पुढील तपास करीत आहेत.