

Poladpur Kashedi tunnel power failure
पोलादपूर: मुंबई - गोवा महामार्ग वरील महत्वाचा दुवा ठरणार रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना भुयारी मार्गाने जोडणारा कशेडी बोगदा पूर्ण क्षमतेने खुला झाला आहे. या भुयारी मार्गिकेमधील वीज सातत्याने बंद पडत असल्याने संभाव्य अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकदाराने याबाबत तत्काळ उपाययोजना करावी,अशी मागणी वाहनधारक आणि प्रवाशांतून केली जात आहे.
कशेडी बोगदा पोलादपूर तालुक्यातील भोगाव हद्दीतून गेला आहे. शिमगो उत्सवाच्या वेळी कशेडी बोगद्यातील दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली होती. यावेळी बोगद्यातील वीज जनरेटरच्या साह्याने चालू करण्यात आल्या होत्या. एप्रिल, मे महिन्यात विद्युतीकरणचे काम पूर्ण करत भुयारी मार्ग प्रकाशमय करण्यात आला होता. मात्र, गेल्या काही दिवसांत भुयारी मार्गिकेमधील अनेक दिवे बंद असल्याचे दिसून आले आहे.
या बोगद्यासाठी 530 कोटी पेक्षा जास्त खर्च झाला आहे. हा प्रकल्प मागील 5 वर्षांपासून चालू होता. अद्यापही अनेक ठिकाणी संरक्षक जाळी बसविणे बाकी आहे. याबाबत संबंधित कर्मचारी यांना विचारणा केली असता रत्नागिरी दिशेने जाणाऱ्या बोगद्यातील वीज सुरळीत आहे. तर मुंबई दिशेने जाणाऱ्या बोगद्याची वीज सुरू आहे. मात्र, तांत्रिक बिघाड निर्माण होत असल्याने वीज जात आहेत.
कशेडी बोगद्यात विजेअभावी अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वीज पुरवठ्याअभावी वाहनचालकांची फसगत होत आहे. बोगद्यात मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का?, यावर तत्काळ कायम स्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.
- प्रसाद दिलीप गांधी, सामाजिक कार्यकर्ते (संस्थापक अध्यक्ष मदत ग्रुप खेड)