रायगड – कांदळवन ऱ्हास, अवैध गौणखनिज उत्खननाचे प्रमाण वाढले

रायगड – कांदळवन ऱ्हास, अवैध गौणखनिज उत्खननाचे प्रमाण वाढले

अलिबाग – पुढारी वृत्तसेवा – रायगड जिल्ह्यात कांदळवनांची होणारी बेकायदा कत्तल, त्याचसोबत अनेक ठिकाणी कांदळवनांवर मातीचे भराव करणे आणि कचरा टाकणे अशा प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. त्याच बरोबर शासनाची कोणतीही रितसर परवानगी वा परवाना न घेता अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खन्न करुन त्याची बेकायदा वाहतूक करण्यात येत असल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत.
याबाबत स्थानिक प्रशासनाकडे लेखी तक्रार करणे आणि मग शासनाच्या यंत्रणेने कारवाईसाठी जाणे या संपूर्ण टप्प्यात मोठा कालावधी लागतो. या कालावधीत बेकायदा घटना घडून जातात आणि कांदळवनांचा ऱ्हास होतो. त्याचबरोबर बेकायदा गौण खनिज उत्खनन होते. हा कालापव्यय टाळून कारवाई करता यावी, याकरिता रायगड जिल्हा प्रशासनाने या बाबत थेट तक्रार करण्याकरिता जिल्हा प्रशासन नियंत्रण कक्षातील टोल फ्री क्र-1077 व व्हॉटसअप क्र. 8275152363 हे नागरिकांना उपलब्ध करुन दिले आहेत.

जिल्ह्यातील नागरिकांनी या क्रमाकांचा वापर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कांदळवनाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी जनहित याचिका 87/2006 मध्ये दि. 17 सप्टेंबर 2018 रोजी आदेश पारीत केले होते. त्यानुषंगाने, शासन, महसूल व वन विभागाकडील दि. 16 ऑक्टोबर 2018 च्या शासन निर्णयान्वये सागरतटीय जिल्ह्याकरिता कांदळवनाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी विभागीय स्तरावर तसेच जिल्हा/तालुका स्तरावर संनियंत्रण समित्या गठीत करण्याबाबत निर्देश दिले होते.

त्यानुसार विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडील दि.03 नोव्हेंबर 2018 रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने व जिल्हा प्रशासनाच्या दि.16 नोव्हेंबर 2018 च्या आदेशान्वये जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी कांदळवनाचे संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने कांदळवनाचा ऱ्हास व तोडीबाबत जिल्हास्तरावर तक्रार दाखल करण्यासाठी तसेच अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी नियंत्रण कक्षातील टोल फ्री क्र-1077 व व्हॉटसअप क्र. 8275152363 चा वापर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news