

रायगड: रायगड जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच अधूनमधून ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहतील आणि ताशी ७० किमी वेगाने वाऱ्याचे झोत येण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि भारत मौसम विज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी विशेष कृषी सल्ला जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ३१ जुलै आणि १ ऑगस्ट रोजी ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची अत्यंत शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा जोर कायम राहील. २ ऑगस्टनंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुसळधार पावसामुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषी विद्यापीठाने काही महत्त्वाच्या उपाययोजना सुचवल्या आहेत. भात रोपवाटिका, भुईमूग आणि कारळा पिकात पाणी साचून मुळांची वाढ खुंटणे व पाने पिवळी पडण्याचा धोका असल्याने शेतातून अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करण्याची व्यवस्था करावी.
नव्याने पुनर्लागवड केलेल्या भात खाचऱ्यांमध्ये २.५ ते ५ सें.मी. पाण्याची पातळी कायम ठेवावी. आंबा, काजू, नारळ व सुपारी पिकांवर बुरशीनाशके किंवा कीटकनाशकांची फवारणी करताना पावसाची किमान ३ ते ४ तास उघडीप असणे गरजेचे आहे.
औषध धुऊन जाऊ नये म्हणून द्रावणात 'स्टिकर' म्हणजेच चिकटणारा पदार्थ मिसळून फवारणी करावी, तसेच आंब्याला पॅक्लोब्युट्रॉझॉल देतानाही पावसाची उघडीप पाहूनच द्यावे. वादळी वाऱ्यामुळे नव्याने लागवड केलेली आंबा, काजू कलमे तसेच नारळ व सुपारीची रोपे आडवी पडू नयेत म्हणून त्यांना काठ्यांचा मजबूत आधार द्यावा.याशिवाय, विजा आणि वादळी वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी जनावरांना झाडाखाली न बांधता सुरक्षित गोठ्यात ठेवावे.