Raigad rain updates: रायगड जलमय! मुसळधार पावसामुळे २३ धरणे तुडुंब, प्रमुख नद्या इशारा पातळीवर
महादेव सरसंबे
रोहा, रायगड: रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले असून, सलग तिसऱ्या दिवशीही वरुणराजाची कृपा कायम आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणे तुडुंब भरली असून प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे एकीकडे पाणीटंचाईची चिंता मिटली असली तरी, दुसरीकडे नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
रविवारी सकाळपासूनच सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात सरासरी ९६.७१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, तब्बल ९ तालुक्यांमध्ये पावसाने शंभरी ओलांडली आहे. सर्वाधिक १५५ मि.मी. पावसाची नोंद म्हसळा तालुक्यात झाली आहे. सततच्या पावसामुळे सुट्टीचा दिवस असूनही बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.
जिल्ह्यातील धरणांची स्थिती
पावसाचा जोर कायम राहिल्याने जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब मानली जात आहे. आतापर्यंत एकूण २८ धरणांपैकी २३ धरणे १००% भरलेली आहेत. २ धरणे १००% भरण्याच्या मार्गावर आहेत, तर ३ धरणांमध्ये ५७% पेक्षा जास्त पाणीसाठा आहे.
नदी-नाल्यांना पूर, जनजीवनावर परिणाम
धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, धरणे भरल्याने दिलासा मिळाला असला तरी, नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीमुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

