

पुढारी ऑनलाइन | रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा वाद आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या कोर्टात गेला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे या दोन्ही जिल्ह्यांतील पालकमंत्रिपदाबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाशी चर्चा करणार असून त्यानंतर याबाबतचा निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे समजते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान नाशिक व रायगड या दोनही ठिकाणच्या पालकमंत्री पदावर तोडगा निघणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रायगड जिल्ह्यात शिंदेसेनेचे तीन आणि भाजपचे तीन आमदार आहेत. शिंदेसेनेचे भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रिपद हवे आहे. मात्र, जिल्ह्यात अजित पवार गटाचा एकच आमदार असूनही पालकमंत्रिपद अदिती तटकरेंना देण्यात आले होते. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आक्रमक झालेला आहे. पालकमंत्रिपदासाठी इच्छुक शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांनी मुंबई- गोवा महामार्गावर उतरत, रास्ता रोको आंदोलनदेखील केले. त्यामुळे महायुतीत पालकमंत्रीपदाच्या झालेल्या वाटाघाटीत रायगडचा मोठा पेच निर्णाण झाला आहे.
रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री पदाचा आदेश रद्द करून आता जवळपास एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. तरीही या दोन्ही जिल्ह्यांबाबतचा तिढा कायम आहे. अखेर आता हा वाद भाजपच्या दिल्लीतील श्रेष्ठींच्या दरबारात पोहोचला आहे. अमित शहा हे आता याबाबत निर्णय करणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वासोबत चर्चा करून हा तिढा सोडविला जाणार आहे. अमित शहा हे आता याबाबत निर्णय करणार असून त्यानंतर राज्यात अधिकृत घोषणा होईल, असा दावा शिवसेनेच्या गोटातून केला जात आहे.