

Raigad Fort News Update
रायगड: "छत्रपती शिवाजी महाराज की जय....!" अशा घोषणांनी दुमदुमलेला परिसर, पर्यटकांचा वाढलेला उत्साह आणि स्थानिक व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे भाव... हे चित्र होते आज (दि.१९) किल्ले रायगडाच्या पायथ्याशी. निमित्त ठरले जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाचे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला रायगडचा पायरी मार्ग आता केवळ हवामान खात्याचा 'रेड' किंवा 'ऑरेंज' अलर्ट असेल, त्याच दिवशी बंद ठेवला जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी, जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन रायगडचा पायरी मार्ग पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय योग्य असला तरी, यामुळे रायगडावर येणाऱ्या शिवप्रेमी आणि पर्यटकांचा मोठा हिरमोड झाला होता. त्याचबरोबर, ज्यांचे संपूर्ण जीवनमान गडाच्या पायथ्याशी पर्यटकांवर अवलंबून आहे, त्या स्थानिक व्यावसायिकांसमोर रोजीरोटीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.
या निर्णयामुळे होणारी गैरसोय आणि स्थानिकांच्या मागण्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आपल्या भूमिकेचा फेरविचार केला. आज जिल्हाधिकाऱ्यांनी एक सुधारित आदेश जारी करत पूर्वीचे निर्बंध शिथिल केले.
पूर्वीचा निर्णय: पावसाळ्यात पायरी मार्ग पूर्णपणे बंद.
नवीन सुधारित निर्णय: केवळ हवामान खात्याने रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी केलेल्या दिवशीच पायरी मार्ग बंद राहील. इतर सर्व दिवशी मार्ग पर्यटकांसाठी खुला असेल. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करत महाड तालुका पोलिसांनी पायरी मार्गावर लावलेले अडथळे (बॅरिकेटिंग) हटवले आहेत. मार्ग खुला होताच पर्यटकांनी आणि व्यावसायिकांनी जल्लोष करत प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले.
"पायरी मार्ग बंद झाल्याने आमचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. आता प्रशासनाने आमची अडचण समजून घेतली, याचा खूप आनंद आहे," अशी प्रतिक्रिया एका स्थानिक व्यावसायिकाने दिली. एकंदरीत, प्रशासनाने सुरक्षा आणि स्थानिक रोजगार यांच्यात सुवर्णमध्य साधल्याने या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. मात्र, पर्यटकांनीही अलर्टच्या दिवसांत गड चढण्याचा मोह टाळावा आणि आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.