Raigad News | विकासकामांसाठी डोंगर पोखरले.... आता रायगड जिल्ह्यात अनेक गावांवर दरडींची टांगती तलवार!

दहा वर्षात दरडग्रस्त गावांची संख्या 103 वरून वाढून 392
प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र
Published on
Updated on

अलिबाग : पर्यटनासाठी सेकंड होम साठी आणि येऊ घातलेले विविध प्रकल्प ही रायगड जिल्ह्याची नवीन ओळख होत आहे मात्र हा विकास करीत असताना दुसरीकडे मातीसाठी पोखरण्यात येणारे डोंगर, त्याठिकाणी करण्यात येणारी बांधकामे, यामुळे रायगड जिल्ह्यात दरड कोसळून अपघात होऊ शकणाऱ्या संभाव्य दरडग्रस्त गावांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मागील दहा वर्षात दरडीपासून धोका असलेल्या गावांची संख्या १०३ वरुन ३९२ पर्यंत वाढली आहे. पाऊस महिन्याभरावर आला आहे.

पावसाळ्यात दरडीपासून उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून नागरिकांचे संरक्षण करता यावे यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज होत आहे. आपत्ती उद्भवल्यास कोणत्या उपाययोजना करण्यात यादृष्टीने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यात दरडीमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या अन्य नैसर्गिक आपत्तींपेक्षा सर्वाधिक आहे. याशिवाय दरडी कोसळून रहदारी विस्कळित होण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. दरडी कोसळण्यानंतर मदतकार्य राबवण्यापेक्षा आपत्ती येण्यापूर्वी उपाययोजना केल्यास होणारे नुकसान टाळता येणे शक्य आहे. यासाठी जिल्हा प्रशासन गांभिर्याने काम करीत आहे. दरडग्रस्त गावातील नागरिकांचे निरिक्षण, त्यावर तज्ज्ञांनी मांडलेली मते यांचा सखोल अभ्यास करुन यावर उपाययोजना केल्या जात आहेत. पावसाळयात संभाव्य नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतर्फे अँक्शन प्लॅन तयार करण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यात यापूर्वी दरड कोसळून मोठी जिवीतहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. २६ जुलै २००५मध्ये आलेल्या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातील दासगाव, रोहन, जुई, कोंडिवते, अप्पर तुडील या गांवासंह पोलादपूर तालुक्यातील कुडपण, कोंढवी, कोतवाल या गावांमध्ये दरडी कोसळण्याची घटना घडली होती. यामध्ये जवळपास ३०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर २२ जून २०१५ रोजी नेरळ मोहाची वाडी येथे दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. २१ व २२ जुलै २०२१ रोजी महाड येथे तळिये गावात दरड कोसळून ८४ जणांचा मृत्यू झाला. पोलादपूर तालुक्यातील केवनाळे येथे भूस्खलन होऊन ५ जण दगावले. तर साखर सुतारवाडी येथील दरड दुर्घटनेत ६ जणांचा जीव गेला. तीन वेगवेगळ्या दुर्घटनांत एकूण ९५ जणांचा बळी गेला. २८ जण जखमी झाले. याशिवाय आंबेमाची, हिरकणी वाडी, मोहोत, वाघेरी, सवाद, माटवण, डाभीळ येथील शेकडो कुटुंब विस्थापित झाल्याची दुर्घटना घडली होती.

जिल्ह्यातील दरडग्रस्त गावे

रायगड जिल्ह्यात दरड कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असलेली ३९२ गावे असून, सर्वात जास्त १४० गावे पोलादपूर तालुक्यात आहेत. तर महाड १२१, रोहा २०, म्हसळा १४, माणगाव २२, पनवेल ३, खालापूर १२, कर्जत ५, सुधागड ९, श्रीवर्धन १२, तळा ३, अलिबाग ९, मुरुड ९, पेण १३ गावे दरडग्रस्त आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news