Cattle Fodder Crisis: वाढत्या उष्म्याने मोकाट गुरांची फरफट; चाऱ्याअभावी उकिरड्यावरील कचऱ्यावर गुजराण

जनावरांसह नागरिकांच्या आरोग्यालाही धोका
Cattle Fodder Crisis
Cattle Fodder CrisisPudhari
Published on
Updated on

शरद निकुंभ

रायगड: मान्सूनचे आगमन लांबल्याने आणि दिवसेंदिवस वाढत असलेल्या उष्म्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. हिरवा व सुक्या चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाल्याने पाली परिसरातील मोकाट गुरांना अन्न-पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून अखेर उकिरडे आणि डम्पिंग ग्राउंडच त्यांचा आधार बनले आहेत.

कचऱ्यातील सडलेले अन्न, प्लास्टिक आणि इतर घातक वस्तू खाण्याची वेळ या जनावरांवर आली असून त्यामुळे त्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. याचबरोबर स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Cattle Fodder Crisis
Umbrella Demand: पोलादपुरातील बाजारपेठांमध्ये विविध रंगी छत्री-रेनकोट दाखल

पाली शहरातील डम्पिंग ग्राउंड, जुने पोलीस स्थानक परिसर, मधली ळी, बल्लाळेश्वर मंदिर परिसर तसेच बल्लाळेश्वर नगर या भागांतील उकिरड्यांवर सकाळपासूनच मोकाट गुरांची वर्दळ दिसून येते. अन्नाच्या शोधात ही गुरे कचऱ्याचे ढीग फोडून त्यातील अन्नपदार्थ खातात. त्यामुळे परिसरात घाण आणि दुर्गंधी पसरत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

कचऱ्यात टाकलेले अन्न बहुतांश वेळा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये असल्याने गुरांच्या पोटात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जाते. सडलेले, कुजलेले अन्न आणि प्लास्टिक यांचे सेवन केल्याने त्यांच्या पचनसंस्थेवर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे पचनक्रिया मंदावणे, अशक्तपणा येणे, शरीरातील ऊर्जा कमी होणे अशा समस्या निर्माण होतात. अनेक वेळा जनावरे आजारी पडून मृत्युमुखीही पडतात.

Cattle Fodder Crisis
Pirwadi Beach Rescue: उरणच्या पिरवाडी समुद्रात अडकलेल्या पर्यटक जोडप्याला वाचवले; दीडशे मीटर समुद्रात २५ मिनिटे बचाव पथकाचा थरार

डम्पिंग ग्राउंड आणि उकिरड्यांवरील कचऱ्यात धातूचे तुकडे, घरगुती वापराच्या सुया, इंजेक्शनच्या सुया तसेच इतर धारदार वस्तू असतात. या वस्तू अन्नासोबत जनावरांच्या पोटात गेल्यास जठर आणि अन्ननलिकेला गंभीर इजा होण्याची शक्यता असते. पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, सातत्याने प्लास्टिक खाल्ल्याने ते पोटात साचत जाते आणि अखेरीस जनावरांचा मृत्यू होऊ शकतो.

काही वेळा अशा मृत जनावरांचे अवशेष इतर जनावरे किंवा भटके प्राणी खातात. परिणामी रोगांचा प्रसार होण्याची आणि इतर जनावरांनाही जीव गमवावा लागण्याची शक्यता वाढते. स्थानिक नागरिकांच्या मते, शहरात मोकाट गुरांची संख्या वाढत असून त्यांच्यासाठी चारा व पाण्याची कोणतीही शाश्वत व्यवस्था नसल्याने ही परिस्थिती उद्भवत आहे. वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून मोकाट जनावरांसाठी चारा छावण्या, पाणवठे आणि वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

जनावरे मोकाट सोडणे टाळण्याचे आवाहन

पशुपालकांनी आपल्या जनावरांना मोकाट सोडण्याऐवजी त्यांच्यासाठी पेंढा, सुके गवत अथवा उपलब्ध चाऱ्याची व्यवस्था करावी. कचऱ्यातील अन्नपदार्थ जनावरांसाठी घातक ठरतात. प्लास्टिक पोटात गेल्याने ते साचत राहते आणि अखेरीस जनावरांचा मृत्यू होऊ शकतो. ग्रामीण व शहरी भागात स्वच्छता राखत निसर्गपूरक जीवनशैली स्वीकारणे काळाची गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे.

उष्म्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकरी व गुरेपालकांनी आपली गुरे चरण्यासाठी मोकाट सोडू नयेत. मोकाट गुरांचे अपघात होऊन त्यांचा मृत्यू होतो किंवा ती जखमी होतात. शासनाने मोकाट गुरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करावी अथवा पशुपालकांना यासाठी विशेष अनुदान द्यावे.

- केतन म्हसके, उपाध्यक्ष, शिवऋण प्रतिष्ठान व गोरक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news