Raigad Fort Restoration : किल्ले रायगड सिंहासनाचे होणार नव्याने संवर्धन

येत्या राज्याभिषेकापूर्वी कामे पूर्ण करणार; पुरातत्व विभागाचे राजेंद्र दिवेकर यांनी दिला निर्वाळा
Raigad Fort Restoration
किल्ले रायगड सिंहासनाचे होणार नव्याने संवर्धनpudhari photo
Published on
Updated on

महाड : श्रीकृष्ण बाळ

किल्ले रायगडावरील मेघडंबरी, सिंहासन आणि त्याच्याशी संबंधित राज्याभिषेक क्षेत्र परिसराचे संवर्धन काम भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या मुंबई मंडळाद्वारे करण्यात येत आहे. सद्यस्थितीत मेघडंबरीचे संवर्धन त्याचबरोबर मेघडंबरी भोवतीच्या परिसराचे सुस्थितीकरण करण्यात येत आहे. जांभ्या दगडातील चौथऱ्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. परिणामी मेघडंबरीचे ऐतिहासिक देखणे रूप पुन्हा उजळून येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वतंत्र सार्वभौम राजा म्हणून ज्या ठिकाणी राज्याभिषेक झाला, त्या ऐतिहासिक स्थळाच्या विशेष दुरुस्तीचे काम 1953 मध्ये प्रथम हाती घेण्यात आले होते. यामध्ये सिंहासन, दरबार हॉल आणि नगारखाना येथील कामांचा समावेश होता. त्यानंतरच्या काळात सिंहासन परिसरातील संवर्धन प्रयत्नांमध्ये प्रामुख्याने वनस्पती आणि राडारोडा हटवणे, मूळ वास्तूचे अवशेष उजेडात आणणे आणि स्थिरीकरणाच्या उपाययोजनांवर भर देण्यात आला.

Raigad Fort Restoration
Telangana parental bill | अनुकरणीय पाऊल

मूळ दगडीस्थळ ज्यावर सिंहासन स्थापिले होते, त्याच्या मुळ स्वरूपात बदल न करता सभोवताली घडीव दगडांनी बांधकाम करून त्यावर मजबुतीकपण आणि भार तोलण्यासाठी आर.सीं.सी. तुळई टाकून वरील भाग विट सिमेंटने बांधून त्यावर मेघडंबरीची स्थापना करण्यात आली. तसेच नगारखान्याचा मार्ग, जो सिंहासन क्षेत्राकडे जाण्याचा एक महत्त्वाचा औपचारिक मार्ग आहे, तेथे दगडी फरसबंदी करण्यात आली. त्या काळात रायगडावर असलेल्या प्रमुख शिवकालीन इमारतींची डागडुजी केली गेली.

कालौघात प्रतिकुल नैसर्गिक वातावरणामुळे सिंहासनाच्या मूळ जागेच्या सभोवताली संबंधित बांधकामात वापरल्या गेलेल्या लोखंडी सळया, सिंमेंट प्लास्टर, वीटकाम कमकुवत झाले आणि सिंहासनाच्या सभोवताली करण्यात आलेले बांधकाम विद्रूप दिसायला लागले.

सन 2009-10 मध्ये रायगड विकास प्राधिकराणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी मेघडंबरीमध्ये छत्रपती शिवरायांची मूर्ती स्थापित केली; परंतु मूळ अधिष्ठानाच्या भोवतालचे व लगतचे बांधकाम जे विटा, माती आणि सिमेंटमध्ये केले गेले होते, त्याला जसेच्या तसे ठेवून मूर्तीची स्थापना केली.

Raigad Fort Restoration
P.V.Gadkari : समाजाला वाचा फोडण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले

मनोरे, बाजारपेठ, होळीचा माळ, नगारखान्याचे संवर्धन करणार

सन 2018 या वर्षी राज्य शासनाकडून भारतीय पुराततत्व सर्वेक्षण विभागास 11 कोटी रुपये मिळाले. त्यापैकी 2.82 लाख मार्च 2026 पर्यंत बाकी आहेत; परंतु मध्यंतरी 7 कामाचे कार्यादेश पारीत झालेत. त्या अंतर्गत सद्यस्थितीत 6 कामे प्रगतीपथावर आहेत आणि बाकीची कामे गडावर पाणीसाठा पर्याप्त नसल्यामुळे प्रलंबित आहेत, जी पावसाळ्यानंतर हाती घेतली जातील. परंतु त्या कामासाठी 30 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी राज्य सरकारकडे केली गेली आहे. तो निधी उपलब्ध झाल्यास मनोरे, बाजारपेठ, होळीचा माळ, शिपायांचे रहिवास, संपूर्ण राज दरबार, नगारखाना, राणी वसा, दारू कोठार आणि हत्तीखान्यातील वस्तुसंग्रहालय इत्यादी संवर्धनाचे कार्य पूर्ण केली जातील, असे केंद्रीय पुरातत्व विभागाचे अधिकारी दिवेकर यांनी स्पष्ट केले.

समोरच्या बाजूच्या भागात पारदर्शी काच लावण्यात येणार

आज त्या बांधकामाची झालेली बिकट अवस्था लक्षात घेऊन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळांने किल्ल्यावर असलेल्या ऐतिहासिक वास्तूशी निगडीत उपलब्ध असलेल्या पुराव्यानुरूप सिंहासन स्थळाला साजेसे संवर्धन कार्य हाती घेतले आहे. कार्य प्रगती पथावर आहे. येणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाच्या मूळ स्थळाचे अवशेष सर्वांना सहज दृष्टीस पडावे म्हणून समोरच्या बाजूचा भाग पारदर्शी काच लावून विशिष्ट प्रकाशझोतात सतत ठेवला जाणार असल्याची माहिती केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे रायगड किल्ला व्यवस्थापक अधीक्षक राजेंद्र दिवेकर यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news