

महाड ः श्रीकृष्ण बाळ/इलियास ढोकले
हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरील प्रमुख गंगासागर व हत्ती तलावातील पाणी पूर्णपणे संपुष्टात आले आहे. यामुळे या तलावांतून किल्ले रायगडावर होणारी जतन व संवर्धनाची रायगड प्राधिकरणाची सात तर केंद्रीय पुरातत्त्व विभागाची चार ते पाच कामे थांबविण्यात आल्याची माहिती प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
सहा जूनला तारखेनुसार व त्या पश्चात तिथीनुसार होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी गडावर काळा हौद व बारा टाकी मध्ये पाणी उपलब्ध असून त्यातून गडावर येणाऱ्या हजारो शिवभक्तांसाठी पाणी साठवून ठेवण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
मागील वर्षी सरासरीपक्षा जास्त पाऊस होऊन देखील चालू वर्षी झालेल्या तापमानातील वाढीने बाष्पीभवनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात झाल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे किल्ले रायगडावर मागील पाच वर्षापेक्षा जास्त काळापासून रायगड प्राधिकरण व केंद्रीय पुरातत्त्व विभागाची विविध जतन व संवर्धनाची कामे सुरू आहेत.
केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडूनही किल्ले रायगडाच्या पायथ्याशी तसेच मुख्य राजवाड्यांच्या जतन व संवर्धनाची कामे सुरू असून ही कामे थांबविण्यात आल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे. रायगड प्राधिकरणाच्या व केंद्रीय पुरातत्व विभागांतर्गत येणाऱ्या कामांमध्ये पाण्याचा समावेश नाही अशी सफाईची कामे डेब्रिज दूर करण्याची कामे सुरू असल्याचे रायगड प्राधिकरणाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
पुढील महिन्यात सहा जून रोजी तारखेनुसार व त्यानंतर तिथीनुसार होणाऱ्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या लक्षावधी शिवभक्तांच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून ही कामे तातडीने थांबविण्यात येत असल्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला असून किल्ले रायगडावर असलेल्या काळा हौद व बारा टाक्यांमधून मुबलक पाणी उपलब्ध असून त्या ठिकाणाहून पंपाद्वारे या गंगासागर व हत्ती तलावामध्ये व संबंधित ठिकाणी पाणी पोचविण्याची व्यवस्था स्थानिक यंत्रणेकडून प्रतिवर्षाप्रमाणे केली जाईल अशी माहिती चौकशी अंती प्राप्त झाली आहे.
एकूणच मागील काही वर्षात झालेल्या पावसाच्या तुलनेत चालू वर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस होऊन देखील महाड व शेजारील पोलादपूर येथील धरणांचे आटलेले पाणी तसेच या दोन्ही तालुक्यात व प्रामुख्याने महाड शहरांमध्ये निर्माण झालेल्या अभूतपूर्व पाणीटंचाई बाबत जिल्हा प्रशासन गंभीरपणे आगामी काळात दखल घेईल असा विश्वास शिवभक्तांसह स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.
आगामी राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त येणाऱ्या शिवभक्तांसाठी पाण्याची कोणतीही कमतरता किल्ले रायगडावर राहणार नाही असा विश्वास रायगड प्राधिकरण पुरातत्व विभाग व स्थानिक प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आल्याने किल्ले रायगडावर प्रतिवर्षाप्रमाणेच लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत राज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न होईल असा विश्वास शिवभक्तांकडून केला जात आहे.
प्राधिकरणाची कामे थांबविली
रायगड प्राधिकरणाचे किल्ले रायगडावरील अभियंता रोहित वरागडे यांच्याशी केलेल्या चर्चेअंती किल्ले रायगडावरील पाण्याअभावी बंद करण्यात आलेल्या कामांमध्ये यासाठी पाण्याचा महत्वपूर्ण सहभाग आहे असे जतन व संवर्धनाच्या कामांना थांबविण्यात आले असे सांगण्यात आले. यामध्ये फुटका तलाव , महादरवाजा भिंत, महादरवाजा पदपथ , महादरवाजा शौचालय , बेबी केअर युनिट , हत्तीखाना अन्नछत्र , तसेच हत्तीखाना प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा समावेश असल्याचे स्पष्ट केले.