

Archaeology News Raigad
नाते : दुर्गराज रायगडावरील ऐतिहासिक वारशाच्या जतन आणि संवर्धनादरम्यान एक महत्त्वपूर्ण शोध समोर आला आहे. किल्ल्यावरील शिवकालीन दारूगोळा कोठाराचे तळघर उजेडात आले असून, या ठिकाणी अस्सल शिवकालीन फरसबंदीही आढळून आली आहे. या शोधामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लष्करी वास्तुरचना, दारूगोळा साठवण व्यवस्था आणि संरक्षण नियोजनाचा अभ्यास करण्यासाठी नवी माहिती उपलब्ध होणार आहे.
रायगडाच्या दक्षिण दिशेला असलेल्या शिवकालीन दारूगोळा कोठाराच्या संवर्धनाचे काम रायगड विकास प्राधिकरणामार्फत सुरू आहे. या वास्तूचा ढासळलेला भाग स्वच्छ करून त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने दस्तावेजीकरण केले जात आहे. या प्रक्रियेदरम्यान वास्तूतील माती आणि इतर अवशेष हटविण्यात आले. त्यावेळी तळघराचा भाग समोर आला. विशेष म्हणजे, या तळघरात शिवकालीन बांधकामाची अस्सल फरसबंदी आढळल्याने या वास्तूच्या ऐतिहासिक महत्त्वात आणखी भर पडली आहे.
रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी किल्ले रायगडाला भेट देऊन सुरू असलेल्या संवर्धन कार्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी या कामाची माहिती घेतली. संवर्धनादरम्यान समोर आलेल्या तळघरामुळे वास्तूची अंतर्गत रचना, बांधकामाची पद्धत आणि स्थापत्यशास्त्रीय वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिवकाळात दारूगोळा साठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या वास्तूची रचना युद्धकालीन गरजा आणि सुरक्षिततेचा विचार करून करण्यात आली असावी. त्यामुळे या वास्तूचा सखोल अभ्यास केल्यास तत्कालीन मराठा सैन्याची दारूगोळा साठवण व्यवस्था, संरक्षणात्मक उपाययोजना आणि लष्करी नियोजन याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते.
रायगडावरील ऐतिहासिक वास्तूंचे शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन केल्यामुळे इतिहास संशोधक, वास्तुशास्त्र अभ्यासक आणि दुर्गप्रेमींसाठी अभ्यासाचे नवे दालन खुले होत आहे. शिवकालीन युद्धशास्त्र आणि मराठा स्थापत्यकलेचे आजवर दुर्लक्षित राहिलेले पैलू या कामातून प्रकाशात येण्याची अपेक्षा आहे.
दुर्गराज रायगडावरील प्रत्येक वास्तू स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत आहे. त्यामुळे या वास्तूंचे संवर्धन म्हणजे केवळ ऐतिहासिक दगड-मातीचे जतन नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीपूर्ण युद्धनियोजनाचा आणि स्थापत्यकलेचा अनमोल वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.