

अलिबाग : रायगड जिल्ह्यात सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसात ५ जणांचा मृत्यू झाला तर ४ जण बेपत्ता आहेत. पूर, दरडी कोसळणे आणि वाहतूक विस्कळीत झाल्याने परिस्थिती गंभीर बनली असून प्रशासनाने १६ गावांतील ३०३ कुटुंबांमधील १,०३२ नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले आहे.
सोमवारी (६ जुलै) सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या जिल्ह्यात सरासरी २३६.६० मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस खालापूर तालुक्यात ३२३.३ मिमी, महाडमध्ये २७२.२ मिमी तर सुधागडमध्ये २६८.२ मिमी इतका झाला. सावित्री, अंबा आणि कुंडलिका नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत असून पाताळगंगा आणि उल्हास नद्या इशारा पातळीवर आहेत. त्यामुळे नदीकाठच्या तसेच सखल आणि दरडप्रवण भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील २८ लघु सिंचन प्रकल्पांपैकी १७ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून हेटवणे मध्यम प्रकल्पात ५३.२३ टक्के पाणीसाठा झाला आहे. अनेक सखल भागांत पाणी साचले असले तरी काही ठिकाणी पाणी ओसरू लागल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मुंबई-गोवा महामार्गावर दरडी कोसळल्याने अडकलेल्या प्रवाशांना महसूल प्रशासनाने पिण्याचे पाणी, बिस्किटे आणि नाश्त्याची व्यवस्था केली. आपदा मित्र, स्वयंसेवी संस्था, ट्रेकर्स, पोलीस आणि महसूल विभागाच्या संयुक्त प्रयत्नांतून २०० हून अधिक नागरिक आणि पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली.
जिल्ह्यात २५ ठिकाणी दरडी कोसळल्या, तर ७३ घरांजवळ दरडी आल्याने रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. रस्त्यांवरील दरडी हटवून अनेक मार्गांवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून काही ठिकाणी पर्यायी मार्गांचा वापर सुरू आहे. रेल्वे वाहतूकही संथ गतीने सुरू आहे. दरम्यान, पांडवकडा धबधबा, आपटा, वाघाचीवाडी, नेरळ आणि महाड परिसरात धबधबे, नद्या आणि तलावांजवळ घडलेल्या दुर्घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून चार जणांचा अद्याप शोध सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी धबधबे, नद्या आणि पूरग्रस्त भागांमध्ये जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पावसामुळे ९५ घरांचे नुकसान झाले असून ५३४ घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. तसेच १२ गोठे, दोन मंदिरे, दोन शाळा आणि १२ खासगी दुकानांचे नुकसान झाले आहे. पशुधनात दोन गायी, एक बैल आणि ८६ कोंबड्यांचा मृत्यू झाला असून सर्व नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
मुंबई-गोवा महामार्ग दहा तास ठप्प
मुंबई-गोवा महामार्गाव खेड तालुक्या खवटी येथे सोमवारी सकाळी हॉटेल अनुसया परिसरात कोसळलेली दरड दुपारी दोनच्या सुमारास हटविण्यात आली. तोपर्यंत १२ तास बंद असलेला महामार्ग एका मार्गिकेवरून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.