Raigad Heavy Rain : रायगडमध्ये पावसाचा कहर कायम; ४ जणांचा मृत्यू, पाच जण बेपत्ता

१०३२ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर, सावित्री-अंबा-कुंडलिका नद्या धोक्याच्या पातळीवर
Raigad Rain News
Raigad Rain NewsPudhari Photo
Published on
Updated on

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक भागांत पूर, दरडी कोसळणे आणि रस्ते वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्हा प्रशासनाने सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रसिद्ध केलेल्या नैसर्गिक आपत्ती अहवालानुसार, जिल्ह्यात विविध दुर्घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी तर पाच जण अद्याप बेपत्ता आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून १६ गावांतील ३०३ कुटुंबांतील एकूण १,०३२ नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले असून प्रशासनामार्फत त्यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

खालापूर, महाड आणि सुधागडमध्ये सर्वाधिक पाऊस

सोमवारी (६ जुलै) जिल्ह्यात सरासरी २३६.६० मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक पाऊस खालापूर तालुक्यात ३२३.३ मिमी, महाडमध्ये २७२.२ मिमी आणि सुधागडमध्ये २६८.२ मिमी इतका नोंदवला गेला. इतर बहुतांश तालुक्यांतही १५० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, १ जुलैपासून आजपर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी ८९८.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे सावित्री, अंबा आणि कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पाताळगंगा आणि उल्हास नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत. नदीकाठच्या तसेच सखल आणि दरडप्रवण भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

१७ लघु सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो

जिल्ह्यातील २८ लघु सिंचन प्रकल्पांपैकी १७ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहेत, तर हेटवणे मध्यम प्रकल्पात ५३.२३ टक्के पाणीसाठा झाला आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असले तरी पाऊस ओसरताच काही ठिकाणी पाणी ओसरू लागले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्गांसह अनेक राज्य, जिल्हा आणि ग्रामीण रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबई-गोवा महामार्गावर दरडी कोसळल्यामुळे अडकलेल्या प्रवाशांना महसूल प्रशासनाकडून पिण्याचे पाणी, बिस्किटे आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली.

२०० हून अधिक नागरिक आणि पर्यटकांची सुखरूप सुटका

आपदा मित्र, स्वयंसेवी संस्था, ट्रेकर्स, पोलीस आणि महसूल विभागाच्या संयुक्त प्रयत्नांतून पूर आणि दरडप्रवण क्षेत्रात अडकलेल्या २०० हून अधिक नागरिक आणि पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. जिल्ह्यात एकूण २५ ठिकाणी दगड-माती कोसळण्याच्या घटना घडल्या. ७३ घरांजवळ दरडी कोसळल्या असल्या तरी सुदैवाने सर्व रहिवासी सुरक्षित आहेत. धोकादायक भागातील कुटुंबांचे तातडीने स्थलांतर करण्यात आले असून रस्त्यांवरील ढिगारे हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, रेल्वे वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

धबधबे आणि नद्यांच्या ठिकाणी जाण्यास बंदी

पांडवकडा धबधबा, आपटा, वाघाचीवाडी, नेरळ आणि महाड परिसरात धबधबे, नदी व तलावांजवळ घडलेल्या दुर्घटनांमध्येच चार जणांचा मृत्यू झाला असून पाच जण बेपत्ता आहेत. त्यामुळे पर्यटकांनी व नागरिकांनी धबधबे, नद्या आणि पूरग्रस्त भागांमध्ये जाणे पूर्णपणे टाळावे, असे कडक आवाहन प्रशासनाने केले आहे.

नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू

जिल्ह्यात पावसामुळे ९५ घरांचे अंशतः व पूर्णतः नुकसान झाले असून ५३४ घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. याशिवाय १२ गोठे, दोन मंदिरे, दोन शाळा आणि १२ खासगी दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. पशुधनाचेही मोठे नुकसान झाले असून यामध्ये दोन गायी, एक बैल आणि ८६ कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनामार्फत युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news