

रायगड : रायगड जिल्हयातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचाराच्या तोफा गुरुवारी रात्री थंडावल्या. गेल्या महिनाभरापासून रायगड जिल्हयाच्या ग्रामीण भागात विविध पक्षाच्या निवडणूक प्रचाराने राजकीय वातावरण तापले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात मोठे नेते प्रचारात दिसून आले नाही. मात्र शेवटच्या टप्प्या प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला. त्यामुळे जिलहयात निवडणूक प्रचार टीपेला पोहोचला. शुक्रवारी या निवडणुकीचे मतदान होत असून तत्पूर्वी छुप्या प्रचाराला वेग येणार आहे.
रायगड जिल्हयात 59 जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या 118 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. पंचायत समितीची एक जागा बिनविरोध झाल्याने 117 जागांसाठी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी 173 उमेदवार तर पंचायत समितीच्या 117 जागांसाठी 328 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
जिल्हयात भाजप-शिवसेना शिंदे गट-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट-शेकाप-शिवसेना उबाठा गट अशी लढतीची समिकरणे अपेक्षित असली तरी जिल्हयात सर्व तालुक्यात राजकीय पक्षांनी आपआपल्या सोयीप्रमाणे युत्या आणि आघाड्या केलेल्या दिसत आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्यापासून निवडणूकीची उत्सुक वाढीस लागली होती. कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याकडे संपूर्ण जिल्हयाचे लक्ष लागले होते. जागा वाटपबाबत महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या वाटाघाटी शेवटपर्यंत सुरु होते.
27 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघारीनंतर जिल्हयातील निवडणुक लढतींचे चित्र स्पष्ट झाले आणि निवडणूक प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली पहायला मिळाली. याच दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे निवडणूक प्रचारावर मोठा परिणाम झाला. राष्ट्रवादीतर्फे मोठ्या सभांऐवजी बैठकांवर भर देण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निवडणूक प्रचारापासून काही काळ दूर राहिले. तर इतर पक्षांचे मोठे नेत निवडणूक प्रचारात दिसून आले नाही.
निवडणूक आयोगाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमानुसार 5 फेब्रुवारी रोजी मतदान तर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निवडणूक आयोगाने निवडणुकांचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला. त्याप्रमाणे 7 फेब्रुवारी रोजी मतदान आणि 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या नवीन सुधारित कार्यक्रमामुळे उमेदवारांना निवडणूक प्रचारासाठी आणखी दोन दिवसांचा कालावधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले.
1 फेब्रुवारीपासून जिल्ह्यात मोठ्या प्रचाराला सुरुवात झाली. राज्याचे मंत्री शिवसेनेचे नेते भरत गोगावले, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शेकाप नेते जयंत पाटील, जिल्हयातील सर्व आमदार यांच्यासर पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी प्रचारात जोर घेतला. सभा, बैठका वाढल्या. त्यामुळे जिल्हयात प्रचाराच्या आरोप प्रत्यारोपांच्या राळ उडाली. विकासाचे मुद्दे, भ्रष्टाचार, विकासाचे व्हिजन आदी मुद्यांवर प्रचार आला.
या निवडणुकीचा जाहीर प्रचाराची सांगता गुरुवारी रात्री झाली. त्यामुळे जिल्हयातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. शनिवारी मतदान होत आहे. तत्पर्वी शुक्रवारी छुप्या प्रचारावर उमेदवारांकडून भर दिला जाणार आहे. याशिवाय प्रत्यक्ष भेटी-गाठी, बाहेरगावी असलेल्या मतदारांना आाणण्याची व्यवस्था करणे, समाजमाध्यमांवरील प्रचारावर जोर राहणार आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पूर्ण तयारी केलेली दिसून येत आहे. निवडणूक काळात मद्य विक्री बंद ठेवणे, तडिपारी, प्रतिबंधात्मक उपाययोजना, मतदान प्रक्रियेसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, आणि त्यासाठी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
सुधारित कार्यक्रमामुळे उमेदवारांना दिलासा
निवडणूक आयोगाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमानुसार 5 फेब्रुवारी रोजी मतदान तर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निवडणूक आयोगाने निवडणुकांचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला. त्याप्रमाणे 7 फेब्रुवारी रोजी मतदान आणि 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
या नवीन सुधारित कार्यक्रमामुळे उमेदवारांना निवडणूक प्रचारासाठी आणखी दोन दिवसांचा कालावधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. मतदान दोन दिवस पुढे गेल्याने उमेदवारांना प्रचारासाठी आणखी आवधी मिळाला आहे. त्यामुळे या काळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून होताना दिसत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात छुपा प्रचार वेग घेईल.