

मुंबई : उसने घेतलेल्या पाच लाखांची मागणी केली म्हणून एका पायलटला बेदम मारहाण केल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहाजणांविरुद्ध बांगुरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यात निरा देवेन कनानी, देवेन योगेश कनानी व त्यांचा चार बॉडीगार्डचा समावेश आहे.
55 वर्षांचे तक्रारदार अंधेरीतील वर्सोवा-यारी रोड परिसरात त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. त्यांच्यासह त्यांची पत्नी व एक मुलगा सध्या एअर इंडियामध्ये पायलट म्हणून काम करतात. देवेन हा त्यांचा जवळचा मित्र असून या दोघांनी 1995 साली एकत्र उत्तरप्रदेशात पायलटचे प्रशिक्षण घेतले होते. तिथेच त्यांची पहिल्यांदा ओळख झाली आणि ते दोघेही चांगले मित्र झाले.
गेल्या वर्षी देवेनने त्यांच्याकडे पाच लाखांची मागणी केली होती. त्याला पैशांची गरज असून एका महिन्यांत पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीला देवेनला ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने देवेनच्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर केली. मात्र एक वर्ष उलटूनही त्याने त्यांना पैसे दिले नव्हते. याबाबत ते त्याला सतत कॉल करून विचारणा करत होते.
शनिवारी त्याने त्यांना त्याच्या राहत्या घरी पैसे घेण्यासाठी बोलावले. ठरल्याप्रमाणे शनिवारी रात्री ते पैसे घेण्यासाठी देवेनच्या लक्ष्मीनगरच्या गार्डन इस्टेट इमारतीच्या फ्लॅट क्रमांक बी/1401 मध्ये घरी गेले. यावेळी त्याच्या घरी असलेल्या चार बॉडीगार्डसारख्या दिसणाऱ्या व्यक्तींनी त्यांना शिवीगाळ करून हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात त्यांच्या पाठीला, कमरेला, मानेला गंभीर दुखापत झाली.
यावेळी देवेनने त्याची पत्नी निराचे पाय पकडून त्यांना वारंवार माफी मागण्यास प्रवृत्त केले. या घटनेनंतर तक्रारदारांच्या जबानीवरुन पोलिसांनी निरा कनानी, देवेन कनानीसह इतर चार बॉडीगार्ड अशा सहाजणांविरुद्ध दाखल केला. सर्व आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.