

अलिबाग ः रायगड जिल्हयातील दहा नगरपालिकांसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याला प्रारंभ झाला मात्र एकाही नगरपालिकेमध्ये एकही अर्ज दाखल झाला नसल्याचे प्रशासनाकडून सूचित करण्यात आले. राजकीय पक्षांनीही अद्याप आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नाही. ती एकदोन दिवसात होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
येत्या एक दोन दिवसात अधिकृत उमेदवारांची घोषणा जाहीर झाल्यानंतरच सर्व राजकीय पक्ष शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करतील असे एकंदरीत चित्र आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार की स्वतंत्रपणे स्थानिक आघाड्या होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
रायगड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या निवडणुकीची प्रक्रिया आजपासून (10 नोव्हेंबर) अधिकृतपणे सुरू झाली आहे. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील कोणत्याही नगरपरिषदेकरिता एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. नगरपालिका निवडणुकांतील उमेदवारांना उमेदवारी अर्ज व शपथपत्र दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecelec.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे, त्यावर नोंदणी करून नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्ज दाखल करायचा आहे.
एका नोंदणीद्वारे संबंधित प्रभागात एका उमेदवारास चार नामनिर्देशनपत्र दाखल करता येऊ शकतील. संकेतस्थळावर संपूर्ण नामनिर्देशनपत्र व शपथपत्र भरल्यानंतर त्याची मुद्रित प्रत काढून त्यावर स्वाक्षरी करावी लागेल. त्यानंतर ती प्रत विहित मुदतीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करावी लागेल.
जिल्ह्यात अलिबाग, मुरूड, पेण, खोपोली, कर्जत, उरण, महाड, रोहा, माथेरान आणि श्रीवर्धन या दहा नगरपरिषदांसाठी निवडणुका होणार आहेत. या दहा नगरपरिषदांमधील 10 नगराध्यक्ष पदे आणि 217 नगरसेवक पदांसाठी मतदारांना मतदान करावे लागणार आहे. या निवडणुकीत एकूण 2 लाख 37 हजार 503 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, मतदानासाठी 308 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रियेच्या सुरळीत पार पाडण्यासाठी 10 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 20 सहायक निवडणूक अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
पहिल्याच दिवशी कोणत्याही नगरपरिषदेकरिता अर्ज दाखल झाला नसला तरी, उद्या आणि परवा म्हणजेच उर्वरित दोन दिवसांत सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार मोठ्या संख्येने अर्ज दाखल करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली असून, अनेक ठिकाणी आंतरिक चर्चेला वेग आला आहे.
थंडीत राजकीय वातावरण तापणार
निवडणूक विभागाकडून सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली असून, मतदार याद्यांनुसार मतदान केंद्रांवरील सुविधा तपासण्याचे काम सुरू आहे. आगामी काही दिवसांत जिल्ह्यात निवडणुकीचे वातावरण तापण्याची शक्यता आहे. सध्या युती आणि आघाडीतील जागा वाटपाबाबत चर्चा सुरु असल्याचे समजते. येत्या दोन तीन दिवसात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.