

मुंबई: राज्यातील पॉलिटेक्निक महाविद्यालयांमधील शिक्षकांचे तांत्रिक कौशल्य आणि अध्यापन क्षमता अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने यंदा ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम’ (एफडीटीपी) राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यास इच्छुक असलेल्या तंत्रनिकेतन संस्थांकडून मंडळाने प्रस्ताव मागविले असून, पात्र संस्थांनी 23 मेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत दरवर्षी शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी एक आठवड्याचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जातो. बदलत्या तांत्रिक युगात शिक्षकांचे ज्ञान अद्ययावत राहावे, उद्योग क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण देता यावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविला जातो. यंदाही राज्यातील विविध तंत्रनिकेतन संस्थांमध्ये हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
‘फॅकल्टी डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम’ हा पॉलिटेक्निकमधील शिक्षकांचे तांत्रिक ज्ञान, अध्यापन कौशल्य व उद्योगाभिमुख दृष्टी सक्षम करण्यासाठी आयोजित केला जाणारा प्रशिक्षण कार्यक्रम आहे. यामध्ये नवीन तंत्रज्ञान, आधुनिक अध्यापन पद्धती, उद्योग क्षेत्रात वापरले जाणारे सॉफ्टवेअर, हरित ऊर्जा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑटोमेशन, तसेच प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव यांसारख्या विषयांचा समावेश असतो.
शिक्षकांना बदलत्या तांत्रिक गरजांनुसार अद्ययावत ठेवून विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण आणि उद्योगाभिमुख शिक्षण देता यावे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये औद्योगिक भेटींचाही समावेश असणार आहे. त्यामुळे शिक्षकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाज, तांत्रिक बदल आणि आधुनिक यंत्रणांची माहिती प्रत्यक्ष पाहता येणार आहे. हरित ऊर्जा, नवीन तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष वापरातील आधुनिक सॉफ्टवेअर प्रणालींशी संबंधित विषयांना यंदा विशेष प्राधान्य दिले जाणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.