

Poladpur Mahabaleshwar Road Blocked
पोलादपूर : पावसाळ्याच्या प्रारंभापासूनच रायगड जिल्ह्यातील पोलादपूर आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटावर दरडी कोसळण्याचे संकट कायम आहे. मुसळधार पावसामुळे गुरुवारी रानकडसरी, दाभिल टोक तसेच घाटातील अन्य काही ठिकाणी मातीचे ओसरे कोसळल्याने प्रवास धोकादायक बनला आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो आंबेनळी घाट टाळून पुणे किंवा कराड–चिपळूण या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दोन दिवसांपूर्वी घाटात मोठी दरड कोसळल्याने वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर दरड हटवून वाहतूक पूर्ववत केली होती. मात्र गुरुवारीही मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी माती घसरून रस्त्यावर आल्याने वाहतुकीत पुन्हा अडथळे निर्माण झाले. प्रशासनाने तातडीने यंत्रणा घटनास्थळी पाठवून रस्ता साफ करत एकेरी वाहतूक सुरू केली.
या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक कारणाशिवाय आंबेनळी घाटातून प्रवास टाळावा, असा सल्ला पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे यांनी नागरिकांना दिला आहे. प्रवास अपरिहार्य असल्यास वाहनचालकांनी विशेष खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही त्यांनी सांगितले.
कोकण व घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरकड्यांवरील माती सैल झाली असून दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे वाहनचालक आणि पर्यटकांनी विशेष सतर्क राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात घाटातील हवामान क्षणाक्षणाला बदलत असल्याने दाट धुके, कमी दृश्यमानता, रस्त्यावर पाणी साचणे आणि अचानक दरड कोसळण्याची शक्यता कायम असते. त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा मुसळधार पावसात घाटातून प्रवास टाळण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
प्रवास करावाच लागल्यास वाहनांचा वेग नियंत्रित ठेवावा, सुरक्षित अंतर राखावे आणि दरडप्रवण ठिकाणी अनावश्यक थांबू नये, असे आवाहन तहसीलदार घोरपडे यांनी केले आहे. तसेच दरड कोसळणे, झाड पडणे, रस्ता खचणे किंवा अन्य कोणतीही धोकादायक घटना आढळल्यास तत्काळ पोलादपूर तहसील कार्यालय, पोलीस प्रशासन किंवा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.